Pune News : एक जानेवारीपासून जम्बो हॉस्पिटलमधील नवीन रुग्ण प्रवेश बंद !

एमपीसी न्यूज : कोरोनाची दुसऱ्या लाटेची शक्यता ओसरल्यामुळे तसेच रुग्णसंख्या घटल्यामुळे प्रारंभी कोविड केअर सेंटर, क्वारंटाईन सेंटर बंद करणाऱ्या महापालिकेने आता शिवाजीनगर येथील जम्बो कोविड हॉस्पिटल पुर्णत: बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या जम्बो हॉस्पिटलमध्ये प्रवेश बंद केले असले तरी, येथील नवीन रुग्णांना बाणेर येथील कोविड रुग्णालयात आणि ससून रुग्णालयामध्ये दाखल केले जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे. सध्या जम्बो हॉस्पिटलमध्ये 137 रुग्ण दाखल असून, 1 जानेवारीपासून नवे रुग्ण प्रवेश बंद होणार आहेत.

शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटल बंद होणार असले तरी, अद्याप पिंपरी चिंचवड येथील जम्बो हॉस्पिटल बाबतचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाच्या रुग्णांची वाढ लक्षात घेता, पुणे महापालिका हॉस्पिटलमध्ये असलेली व्यवस्था पुरेशी आहे. आजमितीला नायडू रुग्णालयासह, बाणेरमधील डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल, लायगुडे आणि दळवी हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी मनुष्यबळ यांसह पुरेशी उपचार व्यवस्था उपलब्ध आहे.

या संदर्भात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल म्हणाल्या, कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने दिवाळीपूर्वी महापालिकेने उभारलेल्या यंत्रणा आहे तशा ठेऊन ठेवून शहरातील कोविड केअर सेंटर टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली.

त्याच पद्धतीने शिवाजीनगर येथील जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये यंत्रणा जागेवर ठेवून रुग्णांचे प्रवेश बंद केले जाणार आहेत. दररोज जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत, त्यातील बहुतांश रुग्ण होम क्वारंटाईन होत आहेत.

त्यामुळे महापालिकेच्या हॉस्पिटलमधील बेड रिकामे होत आहेत. त्यातच कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण व वाढ लक्षात घेता, जम्बो हॉस्पिटलमधील नवीन रुग्ण प्रवेश बंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.