Pune News : नगरसेवकांच्या ‘संकल्पना’ नामफलकांविरोधात स्वयंसेवी संस्था जाणार न्यायालयात !

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या विविध विभागाकडून, वॉर्डस्तरीय विकास निधीतून केलेल्या कामांवर आणि दिशादर्शक फलकांवर ‘संकल्पना’ म्हणून नगरसेवक नगरसेविका आपली नावे टाकतात. फुकटच्या प्रसिद्धीसाठी नगरसेवक पूर्वीचा फलक असतानाही पुन्हा फलक उभारतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था आता न्यायालयात याचिकेद्वारे दाद मागणार आहेत. संबंधितांकडून अनावश्यक खर्च वसूल करण्याची मागणी देखील करण्यात येणार आहे.

शहरातील विविध रस्ते, चौक, पुतळे, उद्याने, ऐतिहासिक वास्तू, नाट्यगृहे, सभागृह, स्वच्छतागृहे, विरंगुळा केंद्र, विविध संस्था, लोकप्रतिनीधींची निवासस्थाने आदी ठिकाणी महापालिकेकडून नामफलक लावले जातात. परंतु त्याच ठिकाणी पुन्हा ज्या त्या प्रभागातील नगरसेवक ‘संकल्पना’ म्हणून स्वतःचे नाव टाकून पुन्हा नामफलक (पाट्या) लावतात. त्यात एका प्रभागात चार नगरसेवक असल्याने एका ठिकाणी चार चार नामफलक उभारले जातात. त्यामुळे संपूर्ण शहरात नामफलकांचा सुळसुळाट झाल्यामुळे विद्रुपीकरण पहायला मिळते. पुढील वर्षी निवडणुक होत असल्याने सध्या अशा प्रकारचे नगरसेवकांचे नाव असलेले फलक लावण्याचे प्रमाण अचानक वाढले आहे.

महापालिकेत जनतेने कररुपी जमा केलेल्या पैशांच्या जिवावर उधळपट्टी करणार्‍या व विकास निधीचा वापर राजकीय प्रचारासाठी करणारे नगरसेवक उदंड झाले आहेत. याची गंभीर दखल घेऊन महापालिका प्रशासनाने यासाठी धोरण तयार करण्याची घोषणा केली. मात्र कार्यवाही काहीच झाली नाही.

या पार्श्वभूमीवर सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांनी याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. याचिकेवर नागरिकांनी सह्या कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.

याविषयी कुंभार म्हणाले, ‘पालिकेने किंवा इतरांनी केलेल्या कामावर फक्त बाहेर फलक लावून ते आपल्या संकल्पनेतून तयार झाल्याचे भासवणे हे एक प्रकारचे चौर्यकर्म आहे. हेच काम नगरसेवक करत आहेत. नागरिकांच्या पैशांचा हा केवळ अपव्ययच नव्हे, तर अपहारही आहे. त्यांच्या नावाच्या जाहिरातीवर पुणेकरांचा पैसा का खर्च करावा? पालिकेच्या तिजोरीचे पालक असलेल्या पालिका आयुक्तांना हे दिसत नाही का? ते गप्प असतील तर त्याचे कारण काय? असा खर्च करताना पालिकेचे अधिकारी माननीयांना थांबवत का नाहीत?’ असे प्रश्नही कुंभार यांनी उपस्थित केले आहेत.

नागरिकांच्या पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी पालिका आयुक्तांना निवेदन दिले असून, आपण न्यालयात याचिका दाखल करणार असल्याचेही कुंभार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.