Pune News : ‘नॅशनल ग्रीन प्रोग्रॅम’साठी महापालिकेला केंद्राकडून दोन कोटींचा निधी

शहरातील १७ रस्त्यांवरील दुभाजकांवर तयार होणार 'ग्रीन बेल्ट'

एमपीसी न्यूज : शहरातील वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे प्रदूषण वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील 17 रस्त्यांवरील दुभाजकांवर ‘ग्रीन बेल्ट’ तयार केले जाणार आहेत. हे ग्रीन बेल्ट वाहतुकीस अडथळा निर्माण न होता तयार केले जाणार असून वाहनचालकांची व्हिजिबिलिटी वाढवण्यासाठीही या उपक्रमाद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.

शहरातील रस्त्यांची रुंदी वाढत आहे. यासोबतच पुणे शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाहन संख्याही वाढते आहे. परिणामी शहरातील प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ होत चालली आहे. या संदर्भात पालिकेच्या पर्यावरण अहवालामध्ये सुद्धा वस्तुस्थिती नमूद केलेली आहे.

केंद्र शासनाच्या ‘नॅशनल ग्रीन प्रोग्राम’नुसार शहरांमध्ये ग्रीन कॉरिडोर तयार केले जाणार आहेत. त्याप्रमाणे शहरातील 17 ठिकाणांवर असलेल्या प्रशस्त रस्त्यांच्या दुभाजकावर झाडे लावून ग्रीन बेल्ट तयार केले जाणार आहेत.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या संदर्भातील नियमावली पालिकेला प्राप्त झाली आहे. रस्त्यावरील प्रदूषण कमी करणे, वाहन चालकांची व्हिजिबिलिटी वाढवणे, यासाठी हा उपक्रम उपयोगी ठरणार आहे.

याकरिता केंद्र शासनाकडून महापालिकेला दोन कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून यासंदर्भात सल्लागाराचे सुद्धा नेमणूक करण्यात आलेली आहे. लवकरच यासंदर्भात निविदा प्रक्रिया राबविली जाणार असून ठेकेदाराची नेमणूक केली जाणार आहे.

“केंद्र शासनाच्या ‘नॅशनल ग्रीन प्रोग्रॅम’नुसार शहरात 17 ठिकाणी ‘ग्रीन बेल्ट’ तयार केले जाणार आहेत. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या निर्देशांनुसार हा उपक्रम राबविला जाणार असून त्याकरिता पालिकेला केंद्र शासनाकडून दोन कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण होईल.”- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.