Pune News : पवार साहेबांबद्दल अनादर व्यक्त केलेला नाही : चंद्रकांतदादा पाटील

एमपीसी न्यूज : शरद पवार साहेबांबद्दल बोलताना मी नेहमी आदरानेच बोलतो. पण ते देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या म्हणतात, मला चंपा म्हणता ते चालतं तरी पण आम्ही त्याला प्रत्युत्तर देत नाही. शरद पवार साहेबांबद्दल अनादर व्यक्त करायचा नव्हता, असा खुलासा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

काल (शनिवारी दि.21) ओबीसी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाषण करताना, शरद पवार हे अभ्यास नसलेले छोटे नेते आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर अजित पवार यांनी, ‘हे तर सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. मग मी त्याला चंपा म्हटले ते योग्यच होते’, अशी बोचरी टीका केली.

तर हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे बोलत खिल्ली उडवली.

यावर तातडीने खुलासा करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यसरकारमधील काही मंत्री आरक्षणावरून ओबीसी समाजाच्या मनात भीती निर्माण करत आहेत. मराठा समाज ओबीसीचे आरक्षण हिरावून घेत असल्याचे सांगून संभ्रम निर्माण करत आहेत. हाच धागा पकडत मी शरद पवार यांच्याबद्दल ते विधान केले होते. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. शरद पवार यांच्याबद्दल मला आदर आहे. मी वेळोवेळी त्यांचे कौतुकही करत असतो. पण त्यांचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करतात ते चालतं. आम्ही अशा टीकेला भीक घालत नाही, असे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.