Pune News : नो लॉकडाऊन, ओन्ली रिस्ट्रिक्शन्स, कोरोनावर नियंत्रणासाठी धोरणात्मक निर्णय घ्या – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – कोरोनावर नियंत्रणासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्यात कुठेही लॉकडाऊन करणार नाही असे जाहीर करुन, जिल्ह्यांसाठी धोरणात्मक नियमावली आखावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. आज सकाळी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन पुण्यातील प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

पाटील म्हणाले की, कोरोनावर नियंत्रण मिळवताना लॉकडाऊन होणार नाही, असे धोरणच ठरवले पाहिजे. त्यासाठी नो लॉकडाऊन, रिस्ट्रीक्शन्सची अंमलबजावणी केली पाहिजे. तसेच, ज्या-त्या विभागात आवश्यकता आहे, तिथे नागरिकांनी काळजी घेण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन नियमावली तयार केली पाहिजे. या नियमावलीची प्रशासनाने सक्ती केली पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, कोरोनावर नियंत्रणासंदर्भात टाटाने एक सर्वे करुन त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. त्यानुसार रेस्टॉरंट, मॉल आणि उद्याने यावर बंधने घालण्याची मागणी केली आहे. त्यापैकी मॉल्स आणि रेस्टॉरंटमध्ये लोकांच्या संचारावर बंधने घालता येतील. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.