Pune News : पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश नाही – रमेश बागवे

एमपीसी न्यूज – ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षाच्या आजी माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. मात्र, राज्यात सत्तांतरानंतर महाविकास आघाडीत येण्यासाठी पुन्हा काँग्रेस पक्षाच्या वाटेवरील ‘त्या’ दहा जणांना पुन्हा प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती पुणे शहर काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी बुधवारी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना दिली.

गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये गेलेले परंतु मुळचे काँग्रेस पक्षाचे आजी माजी नगरसेवक-नगरसेविका काँग्रेस पक्षाच्या प्रदेश व शहर कार्यकारीणी तसेच पक्षाचे पालिकेतील गटनेते आदी पदाधिकाऱ्यांच्या भेटी गाठी घेत आहेत. त्यांना पुन्हा पक्षात घेणार का, या प्रश्नावर शहराध्यक्ष बागवे यांनी भूमिका स्पष्ट केली.

“विधानसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत स्वार्थापोटी काही आजी-माजी नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस पक्षाला फटका बसला. परंतु आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पुन्हा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश देण्याची विनवणी काही माजी नगरसेवक करत आहेत.

परंतु, जो पर्यंत मी शहराध्यक्ष आहे, तोपर्यंत एकाही गद्दाराला पक्षप्रवेश देणार नाही. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जरी विनंती केली तरी त्यांना पुन्हा पक्षात घेण्यास आमचा विरोध असेल. तसा ठरावच शहर काँग्रेस पक्षाने केलेला आहे.

‘त्या’ सर्व जणांना आम्ही काळ्या यादीत टाकलेलं आहे. त्यांना पक्षात पुन्हा घेतलं तर पक्षाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, त्यांचं मनोधैर्य खचेल. त्यामुळे स्वार्थासाठी पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत पुन्हा प्रवेश देणार नाही,” असा इशारा शहराध्यक्ष बागवे यांनी यावेळी दिला.

सुत्रांच्या माहितीनुसार सदानंद शेट्टी, सुजाता शेट्टी, सुधीर जानजोत, आनंद चंद्रकांत छाजेड, माजी महापौर दत्ता गायकवाड, माजी स्थायी समिती अध्यक्ष रशीद शेख, माजी उपमहापौर मुकारी आण्णा अलगुडे यांच्यासह आणखी काही जण पुन्हा काँग्रेस पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत.

आगामी निवडणूका दोन सदस्यीय वॉर्ड पद्धतीने घ्या

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये चार सदस्यीय पॅनेल पद्धत रद्द करून एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीने निवडणुका घेण्यात येणार आहे. परंतु एक सदस्यीय ऐवजी किमान दोन सदस्यीय वॉर्ड पद्धतीने निवडणुका घेतल्या तर महिला प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि अन्य आरक्षणाची सोडत लागू होणार नाही.

त्यामुळे वॉर्डस्तरावर काम करणारे पक्षाचे नेत्यांसह प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूका दोन सदस्यीय वॉर्ड पद्धतीने घ्या, अशी लेखी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे करणार असल्याचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.