Pune News : जेवताना बोलायचं नाही, 50 लोकांनाच उपस्थितीची परवानगी; लग्नाची नवी नियमावली जाहीर

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी विवाह समारंभ आणि गर्दी होणाऱ्या अन्य समारंभांच्या ठिकाणी कडक निर्बंध लावले आहेत. विवाह समारंभाला 50 लोकांनाच परवानगी देण्यात येणार असून, त्या 50 लोकांमध्ये वाजंत्री, भटजीपासून ते आचारी आणि मदतनीस यांचीही गणना केली जाणार आहे. उपस्थित राहणाऱ्या या लोकांची यादी विवाह समारंभापूर्वी, तर विवाह समारंभ झाल्यावर त्याच्या चित्रिकरणाची ‘सीडी’ पाच दिवसांत संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये जमा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

विवाह समारंभ आणि गर्दी होणाऱ्या समारंभांच्या ठिकाणी सुरक्षित अंतर राखले जावे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहेत. त्यानुसार विवाह समारंभाच्या ठिकाणी विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. विवाह समारंभाला उपस्थित राहण्यासाठी 50 लोकांची मर्यादा आहे. त्यामध्ये वधू आणि वर पक्ष यांच्याकडून समारंभासाठी येणाऱ्या नागरिकांबरोबरच वाजंत्री, भटजी, आचारी आणि मदतनीस यांचीही गणना केली जाणार आहे. त्यांची यादी स्थानिक पोलिस ठाण्यात देण्याची अट घालण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन होणार नाही, यासाठी ग्रामीण भागात विवाह समारंभाची पाहणी करण्यासाठी पोलिस, ग्रामसेवक, तलाठी आणि पोलिस पाटील यांचे भरारी पथक नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील; तसेच कार्यालयाचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

जेवण करताना गप्पा मारण्यास बंदी 

विवाह समारंभाला उपस्थित असलेले नागरिक हे जेवण करत असताना सुरक्षित अंतर ठेवून वावर करतील, यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिले आहेत. त्यासाठी प्रत्येकी सहा फुटांवर खुणा करण्यात याव्यात. जेवण करताना मास्क काढल्यावर उपस्थित नागरिकांनी एकमेकांशी गप्पा मारू नयेत, असेही आदेश देण्यात आले आहेत.

लग्न समारंभाचे व्हिडिओ ‘सीडी’ सादर करण्यासाठी पाच दिवसांची मुदत

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्यक्ष विवाह समारंभाच्या ठिकाणी कार्यालयाचे मालक किंवा व्यवस्थापकांनी कोणकोणत्या सुविधांची व्यवस्था करावी, याबाबतही जिल्हाधिकारी देशमुख यांनी सूचना केल्या आहेत. त्यानुसार कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ समारंभाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव, मोबाइल क्रमांक आणि स्वाक्षरी घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. सॅनिटायझर आणि येणाऱ्या नागरिकांचे शरिरातील तापमान मोजण्याची यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे कार्यालय मालक किंवा व्यवस्थापक यांना सूचविण्यात आले आहे. विवाह समारंभ झाल्यानंतर व्हिडिओ शूटिंगची ‘सीडी’ पाच दिवसांत संबंधित पोलिस ठाण्याला देण्याचेही बंधन घालण्यात आले आहे.

इतर नियम 

  • लग्न समारंभाचे ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक, वाढपे, आचारी, वाजत्री, भटजी व वऱ्हाडी मंडळी यांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील.
  • लग्न समारंभाचे ठिकाणी गुटखा, पान, तंबाखू खाऊन थुंकणे व असेही थुकणेस व मद्यपान करण्यास सक्त मनाई राहील. आणि त्याचे उल्लंघन केल्यास सदरील व्यक्ती दंडनीय कारवाईस पात्र राहील.
  • लग्नसमारंभासाठी विनावातानुकूलित मंगल कार्यालय / हॉल / खुले लॉन / सभागृह वापरणेत यावी. कोणत्याही परिस्थीतीत वातानुकूलित सेवेचा (AC) चा वापर करणेत येऊ नये.
  • लग्न समारंभात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व सर्व नियम व अटी पालन करण्याबाबत जनजागृती करावी.
  • लग्न समारंभाची जागा, वारंवार हाताळले जाणारे भाग, खुच्च्या, लग्नाचा संपूर्ण हॉल, किचन, जेवणाचे ठिकाण, स्वच्छतागृह इत्यादी ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करुन वारंवार निर्जतुकीकरण करावे. तसेच स्वच्छतागृहात हात धुण्यासाठी साबणाची व्यवस्था करावी. 
  • लग्न समारंभाचे ठिकाणी पार्किंग व्यवस्था मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापक / मालक यांच्या मार्फत करण्यात यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.