Pune News : नोडल अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे – विभागीय आयुक्त सौरभ राव

एमपीसी न्यूज – पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलात आणण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक आज (मंगळवारी, दि. 10) विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपायुक्त प्रताप जाधव यांच्यासह निवडणूक यंत्रणेशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पुणे विभागाच्या निवडणूक कामकाजाचा आढावा घेऊन विभागीय आयुक्त म्हणाले, पुणे विभागात पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात. निवडणूक कामकाज करताना ‘टीम वर्क’ समजून परस्पर समन्वयातून कामे वेळेत पूर्ण करावीत. लोकसभा व विधानसभा निवडणूक कामकाज करताना झालेल्या त्रुटी दूर करण्यासाठी सुयोग्य नियोजन करुन त्यानुसार कामकाज पार पाडावे.

उपायुक्त संजयसिंह चव्हाण यांनी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या कामांची माहिती दिली. आदर्श आचारसंहिता राबवून निवडणूका सुरळीत पार पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन काम करावे, असे ते म्हणाले नोडल अधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचारसंहिता, विविध कक्ष, कोविड-19 च्या अनुषंगाने मतदान केंद्रावर आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.