Pune News : पुणे रेल्वे स्थानकावर सापडलेला बॉम्ब नव्हे तर फटाक्याच्या पुंगळ्या

एमपीसी न्यूज – पुणे रेल्वे स्थानकावर आज सकाळच्या सुमारास बॉम्ब असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली अन्न संपूर्ण रेल्वेस्थानकावर खळबळ उडाली.  रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे प्रशासन, लोहमार्ग आणि शहर पोलीस तसेच बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथक या यंत्रणांची तर चांगलीच झोप उडाली. त्यानंतर दोन तासाच्या या गोंधळानंतर सापडलेली वस्तू बॉम्ब नसून फटाक्याच्या पुंगळ्या असल्याचे स्पष्ट झाले. 

आज सकाळच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर साफसफाई करणाऱ्या महिलेला फलाट क्रमांक एकच्या बाहेर बॉम्ब सदृश वस्तू दिसली होती. त्यांनी लोहमार्ग पोलिसांना ही माहिती दिली.

ही माहिती शहर पोलीस, बॉम्बशोधक व नाशक पथक आणि अग्निशामक दलाला देण्यात आल्यानंतर या यंत्रणांची धावाधाव सुरू झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सहआयुक्त संदीप कर्णीक यांनी घटनास्थळी हजेरी लावली.

वस्तू आढळलेला परिसर रिकामा करण्यात आला, तसेच स्टेशनच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. बॉम्बशोधक व नाशक पथकाने तसेच श्वान पथकाने वस्तूची तपासणी केली असता त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्फोटक पदार्थ नसल्याचे तसेच त्या जिलेटीनच्या कांड्या नसल्याचे स्पष्ट झाले.

संबंधित वस्तूची तपासणी करण्यासाठी तसेच ते स्फोटक सदृश्य पदार्थ असल्याचे आढळून आल्यास ते निकामी करण्यासाठी बी. जे. मेडिकल कॉलेजच्या मैदानावर ही वस्तू नेण्यात आली. त्यानंतर ही बॉम्बसदृश्य वस्तू नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

दुपारी बारानंतर स्थानकावरील व्यवहार सुरळीत झाले. या घटनेत कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. रेल्वे स्टेशनवरील रेल्वे वाहतूक सुरळीत झाल्याचे लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद गं. वायसे-पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.