Pune News : पालिकेच्या 9 हजार मिळकतकर थकबाकीदारांना नोटीस

एमपीसी न्यूज – महापालिकेकडून मिळकतकर भरण्यासाठी अभय योजने द्वारे सवलत देऊन आणि कर भरण्याचे  आवाहन करून देखील मिळकत कर थकवणाऱ्या 9 हजार मिळकतधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यापैकी 10 मिळकती सील केल्या आहेत.

महापालिकेच्या स्थायी समितीने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 8 हजार 370 कोटींच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात गेल्या चार ते पाच वर्षात पालिकेस केवळ 4 हजार ते 4 हजार 500 च्या आसपासच उत्पन्नाचे उद्दीष्ट गाठता आले आहे. परिणाम, प्रत्येक वर्षाचा जमा-खर्चाचा अंदाज चुकत असून महापालिकेची अंदाजपत्रकीय तूट 3 हजार कोटींच्या घरात गेली आहे. महापालिकेकडून महापालिकेच्या खर्चासह, अंदाजपत्रकात प्रस्तावित केलेली जमा बाजू तसेच पालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठीप्रयत्न सुरू आहेत.

महापालिकेने यंदा मिळकतकरातून 3 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी सप्टेंबरपर्यंत 1 हजार 51 कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झालेले आहेत. 31 मार्च 2021 पर्यंत उर्वरित दोन हजार कोटी रुपये मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कर गतीने वसूल करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात आले आहे.

यंदा एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्याच्या कालावधीत यातील केवळ 50 हजार जणांनी कर भरला आहे, उर्वरित 94 हजार जणांनी कर भरण्याकडे पाठ फिरवली आहे. त्याचा फटका महापालिकेला बसला आहे.

अभय योजनेचा लाभ घेतलेल्या पण यंदा कर न भरलेल्या नागरिकांकडून पैसे वसूल करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथक तयार केले आहे. या पथकाने गेल्या महिन्याभरात 9 हजारापेक्षा थकबाकीदारांना नोटीस बजावली आहे. कर न भरणाऱ्या 10 मिळकती सील केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.