Pune News : विद्यापीठात आता ऑनलाईन योग शिक्षण

'बेसिक्स ऑफ योगा ऑनलाईन कोर्स' ला सुरुवात: विद्यार्थ्यांना दोन क्रेडिट मिळणार

एमपीसी न्यूज – योग शिक्षणातील मूलभूत माहिती देणारा ‘बेसिक्स ऑफ योगा’ या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून सुरुवात झाली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात योग दिवसाचे औचित्य साधत या अभ्यासक्रमाची घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर यांनी केली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, आयुष मंत्रालयातील संशोधन शास्त्रज्ञ डॉ. भूषण पटवर्धन, आंतरराष्ट्रीय योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, ‘ईएमआरसी’ चे संचालक डॉ.समीर सहस्त्रबुद्धे, ‘आयएमई’चे प्रमुख श्रीरंग गोडबोले आदी उपस्थित होते.

डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या, हा अभ्यासक्रम योग विषयातील मूलभूत गोष्टींची माहिती देणारा संपूर्णपणे ऑनलाईन अभ्यासक्रम आहे. या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतील. 60 तासांचा हा अभ्यासक्रम यशस्वी रित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन क्रेडिट मिळणार आहेत.

डॉ. संप्रसाद विनोद म्हणाले, मन, शरीर व भावना यांच्यात समतोल साधायचा असेल तर योग आवश्यक आहे. स्वतःला ओळखून आपण आहोत तसे स्वीकारण्याची शक्ती ही योग साधनेतून मिळते तसेच शिकण्याचा आनंद जागृतही ठेवता येतो.

यावेळी डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले, योग साधनेला लोकांची मान्य केले असून याचे पुरावे आपल्याला गुगल वर मिळतील. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून योग विषयातील नवे संशोधन खरी माहिती मिळेल.

डॉ. समीर सहस्त्रबुद्धे म्हणाले, ऑनलाईन शिक्षणातील तोच तो पणा या अभ्यासक्रमात येऊ नये यासाठी आम्ही शिक्षक विद्यार्थी संवाद, विषयाची अतिरिक्त माहिती, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे असे अनेक नवे प्रयोग या अभ्यासक्रमात केले आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून व पारंपरिक ज्ञान आणि वैद्यकीय शास्त्र यांची सांगड घालत हा अभ्यासक्रम तयार केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ शिक्षणाबरोबरच शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी हा योग अभ्यास उपयुक्त ठरेल.
– प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.