Pune News : आता मिळकत कराच्या बिलावर अचूक क्षेत्रफळाचा उल्लेख येणार !

एमपीसी न्यूज : पुणे महानगरपालिकेचा मिळकत कराचे बिल नागरिकांना दिले जाते. या बिलावर मिळकत कराची रक्कम, ए आर व्ही सह इतर सर्व तपशिल असतात. परंतू या बिलावर मिळकत कर किती क्षेत्रफळावर आकारला, नोंदणी कधीचा आहे, याचा उल्लेख नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभम्र निर्माण होतो. त्यामुळे यापुढे मिळकतकर बिलावर क्षेत्रफळ, नोंदणी क्रमांकाचा उल्लेख केला जाणार आहे.

अनेक नागरिक आमची सदनिकेचे क्षेत्रफळ आणि अन्य सदनिकेचे क्षेत्रफळ समान असून समान मिळकतकर येत नसल्याची तक्रार करत असतात. त्यामुळे घर, सदनिकेच्या बांधकामाचे वर्ष, मिळकत कराच्या बिलावर त्या मिळकतीचे अचूक क्षेत्रफळ नमूद केले तर नागरिकांमधील संभ्रम दूर होईल. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी सविस्तर चर्चा करून क्षेत्रफळ नमूद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे काँग्रेस पक्षाचे पालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी सांगितले.

पुणे महापालिकेच्या मिळकत कराच्या बिलावर क्षेत्रफळ नमूद करण्यात यावा, अशा सूचना उप आयुक्त, कर आकारणी कर संकलन विभागाला महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिल्या आहेत. यापुढे पुणे महापालिकेच्या मिळकत कराच्या बिलावर क्षेत्रफळ नमूद करण्यात येणार आहे, त्यामुळे पुणेकरांना त्यांच्या बांधकामाच्या एकूण किती क्षेत्रफळावर किती मिळकतकर लावला हे समजू शकणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मिळकतकर आकारणीवरून होणारा गोंधळ यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.