Pune News : आता व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेण्यासाठी मिळणार पगारी रजा !

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेचे जे व्यसनी कर्मचारी व्यसनमुक्त होऊ इच्छितात आणि व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जाऊन उपचार घेऊन इच्छितात त्यांना दहा दिवसांची पगारी रजा दिली जाणार आहे. तसेच व्यसनमुक्ती केंद्राचे बिलही अदा केले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली.

महापालिकेच्या विविध विभागात जवळपास 7 ते 8 हजार चतुर्थश्रेणी कर्मचारी काम करीत आहेत. त्यातही रस्ते झाडणारे, कचरा गाड्यांवर काम करणारे, इमारतींमध्ये झाडणकाम आणि स्वच्छतेची कामे करणारे, रुग्णालय आदी ठिकाणी काम करणारे कर्मचारी अनेकदा व्यसनांचे शिकार झालेले असतात.

त्यांना दारु, तंबाखू, गुटखा आदींची व्यसने जडतात. त्याचा संसार आणि मुलांच्या जडणघडणीवरही विपरीत परिणाम होतो. पालिकेच्या यंत्रणेचा हिस्सा असलेल्या या कर्मचाऱ्यांपैकी अनेकजण स्वत:हून व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जाऊन उपचार घेऊन बरे होऊन आलेले आहेत. त्यांच्यामध्ये बदलही घडलेले आहेत.

या निर्णयासंदर्भात अतिरिक्त आयुक्त अग्रवाल म्हणाल्या, काही दिवसांपुर्वी पालिकेच्या एका कर्मचाऱ्याने अशाच एका व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दहा दिवस राहून उपचार घेतले. त्याने पालिकेला दहा दिवसांचे बिल दिले. हे बिल मंजूर केल्यानंतर अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी ज्या कर्मचाऱ्यांना सुधारण्याची इच्छा आहे त्यांना संधी द्यायला हवी, अशी भूमिका घेतली.

यापुढे व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला पगारी रजा दिली जाणार असून तेथील बिलही महापालिकेतर्फे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.