Pune news: ‘अयोध्येतील श्री राममंदिरासाठी नीलम गो-हे यांच्याकडून एक किलो चांदीची वीट भेट’

एमपीसी न्यूज – अयोध्येतील श्री राम मंदिराच्या पुनर्बांधणीत अर्पण करण्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या व शिवसेना कुटुंबाकडून एक किलो चांदीची वीट अयोध्या राम मंदिराचे पुणे येथील ट्रस्टी श्री स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्याकडे सुपूर्द केली.

अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम वेगाने सुरू झाले आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येच्या राम मंदिराच्या पुनर्बांधणी दरम्यान एक किलो चांदीची वीट शिवसेना आणि गोऱ्हे कुटुंबीय यांच्या वतीने देण्याची इच्छा महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रगट केली होती. ही चांदीची वीट राम मंदिराचे ट्रस्टी यांच्याकडे दिपावली पर्वकलात व बलिप्रतिपदेच्या पुर्वसंध्येला, गोवर्धनपुजेच्या दिवशी 15 नोव्हेंबर 2020  दिवशी  अयोध्येतील श्री राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष श्री स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्याकडे डॉ. गोऱ्हे यांनी सुपुर्द केली.

स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी सांगितले की, अयोध्येत होणार्‍या राम मंदिराकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. हे मंदिर भव्य दिव्य असणार आहे. तसेच मंदिरासाठी अनेकांनी आजवर पुढे येऊन काम केले आहे. अयोध्येच्या श्री राममंदिरासाठी सर्वस्व पणाला लावणारे  व सातत्याने  भूमिका मांडणारे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीसाठी केलेले कार्य कायम सर्वांच्या स्मरणात राहील. त्यांच्या योगदान स्मृती देण्यात आलेल्या चांदीच्या विटेचा आपण स्वीकार करत आहोत.

यादरम्यान स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या कोरोना लॉकडाऊन काळात दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या प्रवचनाच्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या येथे आयोजित केलेल्या पूजेचे दर्शन घेतले व वंदन केले. यावेळी पुणे शिवसेना महिला शहर संघटिका सविता मते, पुणे शहर महिला संघटिका तथा नगरसेविका संगीता ठोसर, उपशहरप्रमुख आनंद गोयल आदी उपस्थित होते.

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 12 नोव्हेंबर 2020  रोजी वर्षा या त्यांच्या निवासस्थानी या विटेला वंदन केले होते. या कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.