Pune News : शहरी योजनेद्वारे एक लाख लाभार्थी : दहा वर्षात 222 कोटी रुपयांची बिले

एमपीसी न्यूज : दहा वर्षांपुर्वी महापालिकेने सुरू केलेल्या शहरी गरीब आरोग्य योजनेचा आजवर एक लाख पुणेकरांनी लाभ घेतला असून या योजनेवर आतापर्यंत 222 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

या योजनेमुळे हृदयविकार, कँसर, ब्रेन हॅमरेज अशा आजारांची दोन लाख रुपयांपर्यंतची बिलाची रक्कम अदा केली जात असल्याने या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना 2010 साली योजना सुरू करण्यात आली. शहरातील एक लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या गरीब व गरजू नागरिकांना सरकारी रुग्णालयांमध्ये पुरेशा आरोग्य व्यवस्था उपलब्ध होत नसल्याने खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. त्यांची आर्थिक क्षमता हलाखीची असल्यामुळे प्रसंगी कर्ज काढावे लागते.

गरीब नागरिकांना मदत मिळावी याकरिता पालिकेकडून एक लाख रुपयांपर्यंतची मदत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत जास्तीत जास्त एक लाख रुपये रुग्णांना उपचारांसाठी दिले जातात. या योजनांमध्ये सर्व प्रकारच्या आजारांचा समावेश करण्यात आलेला आहे.

गेल्या दहा वर्षात शहरातील एक लाख 9 हजार 36 कुटुंबियांनी या योजनेचे सभासदत्व घेतले आहे. या योजनेअंतर्गत 10 लाख 36 रुग्णांना रुग्णालयाचे पत्र देण्यात आले आहे. पालिकेने विविध रुग्णालयांना गेल्या दहा वर्षात 222 कोटी रुपयांची रक्कम दिलेली आहे. या सोबतच या योजनेच्या सभासद असलेल्या नागरिकांना औषधांचा विनामूल्य पुरवठाही केला जात आहे. कोविड 19 महामारीमध्ये देखील हजारो लोकांना या योजनेचा लाभ दिला असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.