Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

एमपीसी न्यूज – कोकणातील रायगड व रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित वित्तहानी झाली आहे. पूरग्रस्तांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक पातळ्यांवर मदतकार्य सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत.

सध्या रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर भागात निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीचा सर्वच यंत्रणा सक्षमपणे सामना करीत आहेत. येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विविध पातळ्यांवर करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.