Pune News : देशभरात उभारणार एक हजार क्रीडा निपुणता केंद्रे; महाराष्ट्रात तीन तर पुण्यात एकाचा समावेश

एमपीसी न्यूज : 2028 पर्यंत ऑलिंपिकमध्ये सर्वाधिक पदके जिंकणाऱ्या देशांच्या यादीत भारत पहिल्या दहामध्ये असावा हे माझे स्वप्न आहे. ते साकार करण्यासाठी स्थानिक पातळीपासून खेळाडूंची निवड करून त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. देशात सुमारे 700 जिल्हे आहेत. काही जिल्ह्यात एक तर काही जिल्ह्यांत 2 अशा प्रकारे संपूर्ण देशात सुमारे 1000 खेलो इंडिया निपुणता केंद्रे उभारण्याची योजना असल्याचे केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितले आहे.

केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालय आणि क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे उभारण्यात आलेल्या खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचा लोकार्पण सोहळा (दि. 18) रोजी पार पडला. या वेळेस ते बोलता होते.

महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विभागीय संचालिका सुश्मिता जोत्सी, खासदार गिरीश बापट, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश आदी या वेळी उपस्थित होते.

यावेळेस केंद्रासाठीच्या तांत्रिक सुविधांसंदर्भात क्रीडा व युवक सेवा संचलनालय व स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) सोबत एक सामंजस्य करार करण्यात आला. तसेच 2021मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिंक स्पर्धेत नेमबाजीसाठी पात्र ठरलेल्या तेजस्वीनी सावंत, राही सरनोबत, स्वरूप उन्हाळकर व बॅडमिंटनमध्ये 19 वर्षांच्या आतील गटात जगातील दुस-या क्रमांकाचा खेळाडू ठरलेल्या वरुण कपूर यांचा सत्कार रिजिजू यांच्या हस्ते करण्यात आला.

आपल्यासारख्या देशांत क्षमता असून त्याचे संधीमध्ये रुपांतर करण्यास आपण कमी पडतो. हे लक्षात घेऊन आम्ही स्थानिक पातळीवरील खेळाडूंच्या क्षमता लक्षात घेत त्यांना प्रशिक्षण देऊन स्पर्धेसाठी तयार करण्याच्या हेतूने भारतभर खेलो इंडिया निपुणता केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. ही केंद्रे स्थानिक, राज्य व राष्ट्रीय पातळीवर काम करतील. यांमुळे खेळाडूंच्या सर्वांगिण विकासावर व खेळांची संस्कृती वाढवण्यावर भर दिला जाईल, असे रिजिजू म्हणाले.

देशाच्या क्रीडा विश्वात पुण्याचे एक वेगळे स्थान आहे. या स्थापन होणा-या निपुणता केंद्रांपैकी तीन केंद्रे महाराष्ट्रात तर एक केंद्र पुण्यात आहे. आपल्याला क्रीडासंस्कृती वाढवण्याबरोबरच ती जपण्याची जबाबदारी उचलायची आहे. प्रत्येक खेळाडूंच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असेल याची शाश्वती सर्वांनी बाळगावी, असेही किरण रिजिजू यांनी सांगितले.

क्रिकेटप्रमाणे इतर खेळांना मिळणारी व्ह्यूअरशिप हा महत्त्वाचा मुद्दा आहे. क्रिकेटप्रमाणे आपल्या पारंपारिक खेळांनाही नागरिकांनी महत्त्व द्या, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

पुण्यात चालू झालेल्या या केंद्रात नेमबाजी, सायकलिंग व ॲथलिट या प्रकारातील प्रत्येकी तीस प्रमाणे एकूण 90 खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रकल्पाची किंमत 38.2 कोटी असून यांत खेळाडूंचे प्रशिक्षण, निवास व भोजन यांचा समावेश असणार आहे. खेळाडूंच्या निवडीचे काम सध्या सुरू आहे. खेलो इंडिया निपुणता केंद्राला आजवर शूटिंग रेंजसाठी 3.70 कोटी रुपये, स्पोर्ट्स सायन्स सेंटरसाठी 1.30 कोटी रुपये तर आवर्ती खर्चासाठी 2.75 कोटी रुपये केंद्र सरकारने उपलब्ध करून दिले असल्याची माहिती बकोरिया यांनी दिली आहे.

खेलो इंडिया उपक्रमासाठी आवश्या सोयीसुविधाची उभारणी, ॲथलीट ट्रॅकची कामे, शूटींग रेंजचे अपग्रेडेशन, स्पोर्ट्स सायन्स सेंटरची उभारणी आदी बाबींसाठी आणखी सरकारी निधींच्या प्रतिक्षेत असून, तो मिळण्यासाठी आम्हाला मदत करावी अशी विनंती बकोरिया यांनी रिजिजू यांना यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.