Pune News: पंतप्रधान घरकुल योजनेतील पाच प्रकल्पांसाठी शनिवारी ऑनलाईन पद्धतीने सोडत

पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर होणार लाइव्ह प्रसारण 

एमपीसी न्यूज : पुणे महानगरपालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पाच प्रकल्पांसाठीच्या घरकुलांची सोडत ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. पात्र अर्जदारांसाठी शनिवारी (दि. 24 ऑक्टोबर २०२०) सकाळी 11 वाजता महापालिकेच्या जुन्या इमारतीतील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह येथे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील यांचीही यावेळी उपस्थिती असणार आहे.

पुणे महानगरपालिकेमार्फत या प्रकल्पांसाठी जानेवारी 2017 ते ऑगस्ट 2017 या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. परवडणारी घरे घटक क्र. 3 या घटकाअंतर्गत प्राप्त झाले असून त्यांची तांत्रिक छाननी पूर्ण झाली असून एकूण 20,000 अर्ज हे तांत्रिकदृष्ट्या वैध आहेत. सदर छाननी अहवाल यादी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोना-19 महामारी व जमावबंदी या कारणास्तव सदर सोडत ही ऑनलाईन असून नागरिकांना याचे प्रसारण पुणे महानगरपालिकेची अधिकृत संकेतस्थळवर https://pmc.gov.in  (Face Book  Live, You Tube live) या माध्यमातून live प्रसारण पाहता येईल. तरी पात्र अर्जदारांना गर्दी न करता ऑनलाईन सोडत पद्धतीने घरकुलाचे वाटप सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.