Pune News : आंबेगाव पठार परिसरातील श्रीराम शिल्पाला होणारा विरोध दुर्दैवी – गणेश बिडकर

एमपीसी न्यूज – प्रभू रामचंद्र हे अवघ्या भारतवर्षाचे प्रेरणास्रोत आहे. त्यांच्या शिल्पामुळे निर्माण होणारे चैतन्य कोणाला डाचत असेल तर ती दुर्देवाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली.

धनकवडीमध्ये क्रीडांगणात श्रीरामांच्या जीवनावर आधारित शिल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. त्यावर बिडकर यांनी प्रतिक्रिया दिली.

ज्यांना हज हाऊसचा कळवळा येतो आणि रामाचे नाव घेतल्यावर तिळपापड  होतो, त्या राष्ट्रवादी काँग्रेसला या श्रीराम शिल्पाने त्रास होणे मी समजू शकतो, अशा शब्दात बिडकर यांनी राष्ट्रवादीच्या टिकेचा समाचार घेतला.

प्रभू श्रीरामांचे भव्य शिल्प उभारण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत निर्णय एकमताने झाला आहे, परंतु, आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असल्याची भूमिका शहराध्यक्ष जगताप यांनी घेतली आहे. याचा अर्थ जगताप यांचे त्यांच्याच पक्षातील नगरसेवक ऐकत नाही असा निघतो.

प्रभू रामचंद्र राष्ट्रपुरूष आहेत आणि या देशाचे प्रेरणास्रोत आहेत, त्यांच्या जीवनातील प्रत्येक घटना जगण्यासाठी आदर्शवत आहे. त्यांचे शिल्प उभारण्यामागे केवळ ते आदर्श पुन्हा पुन्हा जागवणे हाच उद्देश आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांना देवाचा फोटो आपल्या कार्यालयात नाही याचा अभिमान आहे. त्यांना राम शिल्पाचे महत्व समजू शकणार नाही, असेही बिडकर म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.