Pune News : ‘लायगुडे’तील ऑक्सिजन खाटा आता 50 वर – महापौर मोहोळ

सिंहगड रोड भागातील रुग्णांना मोठा दिलासा; 'ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट'मधून ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात

एमपीसी न्यूज – सिंहगड रोड भागातील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचाराची सोय व्हावी, यासाठी पुणे महापालिकेच्या मुरलीधर लायगुडे रुग्णालयात 30 ऑक्सिजन खाटा कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. मात्र वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ही संख्या आता आपण 50 पर्यंत वाढवली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

तसेच ‘लायगुडे’मधील ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट कार्यान्वित करण्यात आला असून त्या ठिकाणी 250 लिटर/प्रति मिनिट ऑक्सिजननिर्मितीला सुरुवात झाली आहे, असेही महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.

‘लायगुडे’मधील ऑक्सिजन खाटा वाढवण्याचा प्रश्न आता मार्गी लागला असून हॉस्पिटलमध्येच ऑक्सिजन निर्मिती सुरु झाली आहे. याचे लोकार्पण महापौर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

_MPC_DIR_MPU_II

पहिल्या टप्प्यात 30 ऑक्सिजन खाटा कार्यान्वित केल्या होत्या. आता ही संख्या 50 झाली आहे. उद्घाटनावेळी आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, श्रीकांत जगताप, प्रसन्न जगताप, नगरसेविका निता दांगट, राजश्री नवले, मंजुश्रीताई नागपुरे, पुणे शहर भा.ज.पा.उपाध्यक्ष अरुण राजवाडे, बाळासाहेब नवले, युवा मोर्चा सरचिटणीस सारंग नवले, युवा कार्यकर्ते आशिष कदम, समीर रायकर, प्रज्वल मांढरे तसेच महानगरपालिका अधिकारी, इतर पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.

महापौर मोहोळ म्हणाले, ‘कोरोना संकटकाळात जी आवश्यकता असेल त्या गरजा आपण पूर्ण करत आहोत. लायगुडेमधील ऑक्सिजन खाटा वाढवाव्यात, अशी सिंहगड रोड परिसरातील नागरिकांची मागणी होती. ‘लायगुडे’मध्ये ‘सीएसआर’च्या माध्यमातून ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट उभा केला आहे. तसेच याठिकाणी असणाऱ्या खाटा 50 पर्यंत वाढवून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यकाळात अजूनही या ठिकाणी लिक्विड ऑक्सिजन टँकची आवश्यकता असेल तर तो नक्कीच उभारला जाईल.

‘लायगुडेमधील ऑक्सिजन खाटा वाढवण्यासाठी सर्वांनीच पाठपुरावा केला. एखाद्या विषयावर सामूहिक प्रयत्न केले गेले तर नक्कीच यश मिळते, हे यावरुन स्पष्ट झाले आहे. शिवाय लसीकरणाच्या बाबतीत असणाऱ्या अडचणी लवकरच दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यात नक्कीच यश येईल’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.