Pune News : दळवी रुग्णालयात होणार ऑक्सिजन प्रकल्प

एमपीसी न्यूज : शहरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या दळवी रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे. कर्नाटकातील बेल्लारी येथूनही ऑक्सिजन मागवण्यात येणार असून वाहतुकीसाठी पालिकेने 3 टँकर ही भाडेतत्वावर घेतल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.

शहरातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रामुख्याने ऑक्सिजन पातळी खालावल्याने मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. आजमितीला साडेपाच हजार रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे एकट्या पुणे शहराची ऑक्सिजनची गरज 300 टन वर पोहोचली आहे.

पुणे जिल्ह्यातील विविध कंपन्यामध्ये दररोज 380 टन ऑक्सिजन निर्मिती होते. यापैकी सुमारे 80 टन ऑक्सिजन हा विदर्भ, मराठवाड्याला जातो.

यापार्श्वभूमीवर दळवी रुग्णालय येथे ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्पाचे नियोजन केले आहे. यासाठी कर्नाटकातील बेल्लारी येथील कंपनीला 100 टन ऑक्सिजन पुरवठ्याची ऑर्डर देण्यात आली आहे, तसेच जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लांट वरून ऑक्सिजन आणण्यासाठी अनुक्रमे 9, 5 आणि 3 टन क्षमतेचे टँकर भाड्याने घेतले आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.