Pune News : गावपातळीवरील वीजबिल थकबाकी वसुलीची जवाबदारी ग्रामपंचातींवर

एमपीसी न्यूज : आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्यामुळे महावितरणने सर्वच थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई सुरु केली आहे. त्यातून शेतीचा ग्राहकही सुटलेला नाही. आता पाणीपुरवठा व दिवाबत्तीची देयके भरण्याबाबत सर्व ग्रामपंचायतींना महावितरणने नोटीस दिली असून देयके न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे.

बारामती परिमंडलात पाणीपुरवठ्याचे 7722  व दिवाबत्तीचे 11577 ग्राहक थकबाकी असून त्यांच्याकडे अनुक्रमे 147 कोटी व 809 कोटी रुपयांची थकबाकी आहे.
महाराष्ट्र शासनाने गाव पातळीवरील दिवाबत्तीचे व पाणीपुरवठ्याचे वीजबिल भरण्याची शंभर टक्के जबाबदारी आता ग्रामपंचायत पातळीवर सोपवली आहे. त्यासाठी शासनाने 15 व्या वित्त आयोगाचा निधी वापरण्याची सूचना ग्रामपंचायतीला केली आहे. वीजबिलांसाठी सरपंच व ग्रामसेवकांना जबाबदार धरणार असल्याचे म्हटले आहे.

बारामती मंडलात पाणीपुरवठ्याचे 1127  ग्राहक असून त्यांच्याकडे 54 कोटी 47 लाख, सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 3833 जोड असून त्यांच्याकडे 76 कोटी 79 लाख तर सातारा जिल्ह्यात 2762 ग्राहकांकडे 16 कोटी 42 लाख रुपयांची थकबाकी आहे.

दिवाबत्तीमध्ये बारामती मंडल 3635 कनेक्शन व थकबाकी 281 कोटी 19 लाख, सोलापूर जिल्हा 5776 ग्राहक 457 कोटी 84 लाख रुपये थकबाकी तर सातारा जिल्ह्यात 2166 ग्राहकांकडे 70 कोटी 91 लाख रुपयांची थकबाकी आहे.

महावितरणतर्फे ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा व दिवाबत्त्तीच्या देयकांबाबत पत्रव्यवहार करुन अवगत केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनीही महावितरणला सहकार्य करुन आपली वीज देयके वेळेत भरावीत व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.