Pune News : आपल्या कमाईतील काही भाग हा वंचितांसाठी द्यावा – चंद्रकांत पाटील

अभिनेते आनंद इंगळे व क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने घरेलू कामगार महिलांना किराणा किट वाटप

एमपीसी न्यूज – कोरोना काळात कष्टकरी वर्गाला आरोग्य समस्येसह आर्थिक संकटाचा ही मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागला, अशा वेळी आपल्या कमाईतील काही भाग वंचितांसाठी दिला जावा, अशी समाजातील अनेकांची भावना दिसून आली हीच आपली संस्कृती आहे असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

अभिनेते आनंद इंगळे यांच्या सहकार्याने क्रिएटिव्ह फाउंडेशनने आयोजित केलेल्या घरेलू कामगारांना किराणा किट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध अभिनेते आनंद इंगळे, राहुल सोलापूरकर, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, कार्यक्रमाच्या संयोजिका शिक्षण मंडळ अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, शहर सरचिटणीस नगरसेवक दीपक पोटे, उपाध्यक्ष डॉ संदीप बुटाला, कोथरूड मंडळ अध्यक्ष पुनीत जोशी, महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, जयश्री तलेसरा, मंगल शिंदे, युवा मोर्चा अध्यक्ष सौरभ अथनीकर, युवा मोर्चा शहर सरचिटणीस दीपक पवार,किरण देखणे, निलेश कोंढाळकर, विशाल रामदासी व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अंतर्नाद योग केंद्र व निसर्गायन बाल वाचनालायचे संचालक व प्रसिद्ध वन्यजीव तज्ज्ञ अनुज खरे, पुष्कर चौबळ व संदीप खर्डेकर यांनी आ. चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने वाघाचे शिल्प भेट दिले तर विक्रम पोतदार यांनी ड्रोन च्या माध्यमातून जंगलात काढलेल्या निसर्गचित्राचे *विहंगम* हे पुस्तक भेट दिले. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाच्या संकटकाळात अनेक हात मदतीसाठी पुढे आले मात्र सरकारने करण्यासारखे खूप काही असल्याचे नमूद केले. तसेच अनेकांचे रोजगार बुडाले आहेत त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याची गरज असल्याचे सांगतानाच याच भावनेतून वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून 2000 रिक्षाचालकांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे CNG कुपन मोफत वाटले असल्याचे सांगितले. दुसऱ्या लाटेनंतर आता तिसरी लाट येऊच नये यासाठी लसीकरण महत्वाचे असून त्यासाठी वंचित घटकांना उद्या मोफत लसीकरण मोहीम राबवत असल्याचे ही चंद्रकांत पाटील म्हणाले.

तत्पूर्वी आनंद इंगळे यांनी कर्तव्य भावनेतून काही घरेलू कामगार भगिनींना मदत करत असून संकटकाळात प्रत्येकाने पुढे येऊन आपले देणे दिले पाहिजे. मात्र उद्या जेव्हा घेणाऱ्यांचे चांगले दिवस येतील तेव्हा त्यांनी देखील समाजातील गरजूना मदत करावी असेही आनंद इंगळे म्हणाले.

राहुल सोलापूरकर यांनी जास्तीतजास्त नागरिकांच्या लसीकरणावर भर दिला जावा असे सांगतानाच मी स्वतः शासकीय लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेतली व या माध्यमातून नागरिकांना लसीकरण करण्यास प्रेरित केले असे स्पष्ट केले.

मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले की घरेलू कामगार महिलांना मोठया आर्थिक संकटाचा सामना करावा लागला, अनेकांच्या घरातील कमावते पुरुषांचा रोजगार बुडाला म्हणून या भगिनींना आधाराची गरज असल्याने किराणा किट वाटपाचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक तर संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.