Pune News : माझी वसुंधरा सायकल रॅली उत्साहात पार

एमपीसी न्यूज: पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश देण्यासाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली माय अर्थ फाऊंडेशन, वनराई, आधार सोशल ट्रस्ट, सिंहगड युवा फाऊंडेशनच्यावतीने व संकल्प मानव संसाधन विकास संस्थेच्या सहकार्याने ही सायकल रॅली आज पार पडली.

ही रॅली सनसिटी रोड, आनंद नगर ते माणिकबागमार्गे धायरी अशी पार पडली असून धायरी येथे या रॅलीचा समारोप झाला.

यावेळी पुणे मनपा सहाय्यक उपायुक्त माधव जगताप, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, घनकचरा विभाग पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, मानसोपचार तज्ञ डॉ. पी.एन. कदम, वनराईचे सचिव अमित वाडेकर, अभिनेत्री स्मिता गोंदकर, संतोष चाकणकर, मनिष जगदाळे, माय अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत, ललित राठी, अमित कुदळे, विशाल टोले उपस्थित होते.

जेव्हा आपण एखादी वस्तू नवीन घेतो, तेव्हा त्याबरोबर युझर मॅन्यूअल दिलेले असते. वस्तू योग्य पद्धतीने कशी वापरावी याबाबतचे मार्गदर्शन त्यात केलेले असते. तसेच मनुष्य जन्माला येतो तेंव्हा त्याला त्याच्या शरीराची ठेवण कशी ठेवावी, त्याची निगा कशी राखावी, यासाठी त्याला घरी आणि शाळेत शारिरीक शिक्षणाचे धडे दिले जातात. त्यामुळे ह्या शारिरीक शिक्षण दिनानिमित्त सायकल चालवण्याचा अनमोल संदेश या रॅलीद्वारे देण्यात आला असल्याचे डॉ कदम यांनी सांगितले.

या अभियानात पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीकोनातून सर्वांनी यांत सहभाग घेतला. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी वाहनांऐवजी सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा, असा संदेश या रॅलीतून देण्यात आला असल्याचे अनंत घरत यांनी सांगितले.

नागरिकांनी बेजबाबदारीने कचरा जर रस्त्यावर टाकला तर महापालिकेच्या विनंतीवरून पोलीस प्रशासन कठोर पावले उचलेल. तसेच नागरिकांना शिस्त लागावी यासाठी नाथाळांना पोलीसांकडून प्रसादही दिला जाईल, असे पोलीस निरीक्षक देविदास घेवारे म्हणाले.

यावेळी मनपा सहाय्यक उपायुक्त माधव जगताप यांनी शहरातील कचरा समस्या सोडवण्यासाठी महापालिका नागरिकांच्या सहभगातून ‘शून्य कचरा प्रकल्प म्हणजेच झिरो गार्बेज सिस्टीम’ राबवणार असल्याचे व माझी वसुंधरा अंतर्गत हा उपक्रम सुरू करणाऱ्या संस्थांचे यावेळी त्यांनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.