Pune News : ‘कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन त्वरित द्या, त्यांना 5 लाख विमा कवच द्या’

माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांचा स्थायी समितीला प्रस्ताव

एमपीसी न्यूज – पुण्यात मागील 6 महिन्यांपासून कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. या काळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगार, अतिक्रमण, सुरक्षा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन त्वरित द्या, तसेच त्यांना 5 लाख विमा कवचही द्या, असा प्रस्ताव माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी बुधवारी स्थायी समितीला सादर केला आहे.

कामात दिरंगाई करणाऱ्या वरिष्ठ अधिकारी व खातेप्रमुखांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांचे वेतन रोखले जावे, तसे आदेश देण्याची विनंतीही या प्रस्तावात करण्यात आली आहे.

विविध विभागात काम करणारे जवळपास 3500 कंत्राटी कामगार आहेत. विविध कोविड सेंटर, दवाखाने, प्रसूतीगृह, कोरोनाच्या आस्थापना, पुणे महापालिकेच्या समाज विकास विभाग मार्फत समूह संघटिका मागील 6 महिन्यांपासून सेवा देत आहेत. या कर्मचाऱ्यांना पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या संरक्षणाच्या लाभ होत नाही.

एवढेच नाही तर या कर्मचाऱ्यांना दोन ते तीन महिने झाले वेतनही देण्यात आले नाही. याहून पुढे या कर्मचाऱ्यांना कामावरही घेण्याचे आदेश देखील दिलेले नाही. संबधीत खातेप्रमुख केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम करीत आहे. त्याचा फटका या कर्मचाऱ्यांना बसत आहे.

त्यामुळे महापालिका आयुक्त यांनी तात्काळ लक्ष घालून अतिरिक्त आयुक्त, खातेप्रमुख यांना तात्काळ आदेश देऊन या कामगारांची रखडलेले वेतन त्वरित द्यावी, लवकरात लवकर त्यांना कामावर घ्यावे, असेही डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रस्तावात म्हटले आहे.

या प्रस्तावावर  अनुमोदक म्हणून सोनाली लांडगे यांची सही आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.