Pune News : सदनिकांच्या भाडेपोटी 23 लाख 95 हजार रुपयांचा पालिकेच्या तिजोरीत भरणा !

एमपीसी न्यूज : महापालिकेला ‘आर 7’ अंतर्गत मिळालेल्या सदनिकांचे अनेक वर्षांपासून करारनामे रखडल्यामुळे महापालिकेचे तीन कोटी रुपयांचे भाडे थकीत आहे. संबंधित भाडेकरुंना महापालिकेने नोटीसा बजावल्यानंतर गेल्या महिन्याभरात 24 लाख 95 हजार रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

महापालिकेला नवीन बांधकाम प्रकल्प सुरू असताना ‘आर 7’ अंतर्गत काही सदनिका मिळतात. विविध रस्त्यांच्या कामांमध्ये बाधित कुटुंबांचे या सदनिकांमध्ये पुनर्वसन केले आहे. या कुटुंबांना दरमहा अवघे साडे चारशे रुपये भाडे आकारले जाते. परंतु, मागील दहा-पंधरा वर्षांपूर्वी दिलेल्या या सदनिकांचे करारच झाले नव्हते.

पालिकेच्या अशा एकूण 67 इमारती आहेत. कोट्यवधींचे उत्पन्न बुडत असल्याने तीन टप्प्यात करारनामे करण्याची मोहीम हाती घेतली आहे. हे करारनामे करताना वारसांमध्ये वाद होऊ नयेत याकरिता संबंधित भाडेकरुंच्या वारसांकडून संमतीपत्र देखील घेतली जाणार असून विधी विभागाचा अभिप्राय देखील घेतला जाणार आहे.

महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून आतापर्यंत 700 सदनिकाधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यानंतर 15 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर या काळात 24 लाख 95 हजार 135 एवढी थकबाकी पालिकेच्या तिजोरीत जमा झाली.

पालिकेच्या मालकीच्या सदनिकांमध्ये ज्या रहिवाशांनी पोटभाडेकरू ठेवलेले आहेत. त्यांच्यासोबत करारनामे केले जाणार नाही. त्यांना सदनिका मधून बाहेर काढले जाणार आहे. ३० नोव्हेंबर पर्यंत करारनामे करण्याची मोहीम पूर्ण करणार असून त्यासाठी रहिवाशांनी देखील महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून थकबाकीदारांना नोटिसा बजावल्यामुळे गेल्या महिन्याभरात २५ लाख रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे. या सदनिका धारकांचे करारनामे करून घेतले जाणार आहेत. थकित 3 कोटींपैकी 1 कोटींचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल.- राजेंद्र मुठे, उपायुक्त, मालमत्ता व्यवस्थापन विभाग

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.