Pune News : खाकी गणवेश परिधान न केल्यास 500 रुपयांचा दंड !

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी खाकी गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे. परंतु, सेवा बजावित असताना जे कर्मचारी विहीत करून दिलेला खाकी गणवेश परिधान करणार नाहीत, अशा कर्मचाऱ्यांना प्रतिदिन 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार असून शिस्तभंगाची कारवाई सुद्धा केली जाणार आहे.

पुणे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये याविषयी निर्णय घेण्यात आला. पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना पालिकेने गणवेश दिलेले आहेत. सर्व सफाई कर्मचाऱ्यांना खाकी रंगाचे गणवेश देण्यात आलेले आहेत. या गणवेशावर पालिकेचे मानचिन्ह (लोगो) ही छापण्यात आलेले आहे.

परंतू, पालिकेचे पुरुष-स्त्री कर्मचारी त्यांना देण्यात आलेले गणवेश परिधान करीत नाहीत. दैनंदिन वापराच्या कपड्यांवरच ते साफ-सफाईची कामे करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

यासोबतच कचरा संकलन करणाऱ्या गाड्या, घंटा गाड्या, रस्ते झाडणारे, ड्रेनेज स्वच्छता आदी कामे करणारे पालिकेचे कर्मचारी गणवेश घालत नसल्याचे अधिकाऱ्यांच्या पाहणीमध्ये समोर आले आहे.

सध्या फक्त स्वच्छ संस्थेचे कर्मचारी त्यांचे अ‍ॅप्रन व ओळखपत्र परिधान करुन काम करतात. अशाच प्रकारे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे. जेणेकरुन अधिकारी व नागरिकांनाही पालिकेचे कर्मचारी कोण आहेत याची ओळख पटेल.

कर्मचाऱ्यांनी गणवेश घालावा आणि शिस्त पाळली जावी याकरिता आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यासोबतच शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. याबाबतच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयाला देण्यात आल्या आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.