Pune News : खोटी झाडे लावण्यापेक्षा ऑक्सिजन देणारी खरी झाडे लावा : दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाकडून शहरात अनेक ठिकाणी व महापालिकेच्या उद्यानांमध्ये वृक्ष लावले जातात. महापालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार शहरास अजून पुर्णपणे ग्रीन कव्हर होण्याच्या उद्देशाने मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करणे अपेक्षित आहे. मात्र, पुणे महापालिकेकडून वृक्ष लागवड करणेऐवजी खोटी बोलकी झाडे लावली जात आहे. त्यापेक्षा खरी ऑक्सिजन देणारी खरी झाडे लावा, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी आयुक्तांकडे केली आहे.

पुणे महापालिकेकडून महावितरण कंपनीचे बिल न भरल्याने वीजेची थकबाकी भरण्यास पैसे नाहीत अशा आशयाच्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. पुणे महानगरपालिकेकडून कोथरूड येथील उद्यानांमध्ये 88 लाख रूपये खर्च करून झाडे बसवण्याचा घाट घातला जात आहे. कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती खालावली असून शहरातील अनेक विकासकामे आपण थांबविली आहेत.

उपनगरांमध्ये पाणी, ड्रेनेज, रस्ते, विदयुत व इतर पायाभूत सेवा सुविधा नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत असून हे नागरिक महापालिकेचा मिळकत कर पूर्णपणे भरतात. पुणेकरांनी मनपाच्या तिजोरीत मिळकत कराच्या माध्यमातून कोट्यावधींचा भरणा कोरोना काळात उत्पन्न घटले असतानाही मनपावर विश्वास ठेवून केला आहे. याचा गैरफायदा सत्ताधारी पक्षाच्या दबावाने प्रशासनाकडून होत आहे.

महापालिकेकडून खरी झाडे लावण्यापेक्षा खोटी झाडे लावली जाणे ही कोरोना काळात दुर्देवी बाब आहे. वास्तविक पुणे महापालिकेकडून मनपा हददीत सर्वत्र पायाभूत सेवा व सुविधा, रुग्णालयाच्या सुविधा सुसज्ज झाल्यानंतर शहराचे सुशोभिकरण करणे अपेक्षित आहे. कोरोनाच्या रूग्णांना बेड्स उपलब्ध नाहीत, व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत, विलगीकरण कक्षामध्ये सुविधा नाहीत अशी दयनीय अवस्था असताना प्रशासनाकडून 88 लाखांच्या सुशोभिकरणाच्या निविदा प्रक्रिया राबविल्या जाणे हे महापालिकेस व पुणे शहराच्या संस्कृतीला अशोभनीय आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.