Pune News : युवकांच्या आयुष्याशी खेळणे महाविकास आघाडीला महागात पडेल – जगदीश मुळीक

एमपीसी न्यूज – अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण करून त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान करणार्‍या महाविकास आघाडी सरकारने आता पाचव्यांदा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) येत्या रविवारी 14 मार्च रोजी होणारी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलून परीक्षार्थींचे मोठे नुकसान केले आहे. युवकांच्या आयुष्याशी खेळणे महाविकास आघाडीला महागात पडेल असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला.

राज्य लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यातील परीक्षार्थींमध्ये संतापाची भावना आहे. त्याचे पडसाद आज पुण्यात उमटले. पुण्यातील परीक्षार्थींनी आज रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. या आंदोलनकर्त्या परीक्षार्थींना मुळीक यांनी भेट देऊन चर्चा केली. त्यानंतर ते बोलत होते.

मुळीक म्हणाले, ‘परीक्षा तीन दिवसांवर आल्यावर ती पुढे ढकले अयोग्य आहे. महाविकास आघाडी सरकारचा कारभार बिनभरवशाचा, दुटप्पी आणि तुघलकी आहे. 14 मार्चची परीक्षा पुढे ढकलत असताना महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेबद्दल आयोगाच्या परिपत्रकात काही सांगण्यात आलेले नाही. शिवाय राज्यात बँकिंग, यूपीएससी, बोर्डाच्या परीक्षा होतात, मग नेमकी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचे काय कारण आहे. या युवकांना न्याय मिळेपर्यंत भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असून, शासनाविरोधातील आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.