Pune News : महापालिकेला हवा आणखी दहा टन ऑक्सिजन

एमपीसी न्यूज – महापालिकेला सध्या दहा टन वाढीव ऑक्सिजनची गरज आहे. दुसरीकडे ऑक्सिजनची गरज असणार्‍या रुग्णांची संख्या सहा हजाराच्या पुढे गेली आहे. ही दिवसेंदिवस ही संख्या वाढतच असून, ऑक्सिजनच्या उपलब्धीनंतरच महापालिकेने तयार ठेवलेले ऑक्सिजनचे 300 बेड कार्यान्वित करता येतील, अशी माहिती महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.

शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना गंभीर रुग्णांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने ऑक्सिजन बेड वाढविण्यावर भर दिला. याचाच एक भाग म्हणून बिबवेवाडी येथील ईएसआय रुग्णालय, जम्बो रुग्णालय, गणेश कला क्रीडा केंद्र, खराडी येथील पठारे स्टेडीय या ठिकाणी 300 ऑक्सिजन बेडचे नियोजन केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

मात्र, मागील काही दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णालये ऑक्सिजन बेड उपलब्ध असतानाही नवीन रुग्ण घेत नाहीत. तर काही रुग्णालये दाखल रुग्णांच्या नातेवाईकांनी दुसर्‍या रुग्णालयात बेड पाहण्यास सांगत आहे. दुसरीकडे महापालिकेच्या रुग्णालयांनाही ऑक्सिजन तुटवड्याचा फटका बसत आहे.

बिबवेवाडी येथील ईएसआय रुग्णालयात 100 ऑक्सिजन बेडची व्यवस्था आहे. मात्र, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे तेथे केवळ 50 बेड कार्यान्वित केले आहेत. तर शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयात 100 ऑक्सिजन बेड वाढविण्याचे नियोजन होते. परंतु, ते ही लांबले आहे. गणेश कला क्रिडा केंद्र येथील सभागृहात 100 ऑक्सिजन बेड तयार आहेत. तसेच पठारे स्टेडीअम 50 ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. या सर्व ठिकाणी एकुण 10 टन ऑक्सिजन लागणार आहे. त्यामुळे 10 टन ऑक्सिजन उपलब्ध झाला तरच हे 300 ऑक्सिजन बेड कार्यान्वित करता येणार आहेत.

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. स्वंयसेवी संस्था, औद्योगिक कंपन्यांच्या सीएसआर फंडातून ऑक्सिजन निर्मिती करण्याचा विचार सुरू आहे. पाषाण येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने 10 टन ऑक्सिजन निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्याची तयारी दाखविली आहे. त्यासंदर्भातही कार्यवाही केली जात आहे. एकाच ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती करून तो शहरातील इतर भागांतील रुग्णालयात पुरविण्याचे नियोजन आहे.
– रुबल अग्रवाल, अतिरीक्त आयुक्त, महापालिका

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.