Pune News: गणेश चतुर्थीपासून PMPML बससेवेचा पुन्हा ‘श्रीगणेशा’?

एमपीसी न्यूज – पुणेकरांसाठी एक खूशखबर आहे. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे गेले पाच महिने बंद असलेल्या PMPML बससेवेचा पुन्हा ‘श्रीगणेशा’ होणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यासाठी गणेश चतुर्थीचा (22 ऑगस्ट) मुहूर्त निश्चित करण्यात आल्याचे समजते.

_MPC_DIR_MPU_II

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील PMPML बससेवा पुढील आठवड्यात सुरू होणार असून पाच महिन्यानंतर PMPML बस रस्त्यावर धावणार आहेत. बसमध्ये होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन कोरोना संसर्गाचा मोठा धोका असल्याने ही बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. सुरक्षिततेच्या उपाययोजना करून काही अटी-शर्तीवर ही पुन्हा सुरू करण्यास परवानगी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

PMPML च्या बस मार्गांवर धावत नसल्याने PMPML चे उत्पन्न थांबले आहे. त्यामुळे संस्था मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. त्याच बरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने नागरिकांचीही मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करण्याचा पीएमपीएल प्रशासनाचा निर्णय आहे.

यासंदर्भात पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे PMPML प्रशासनानं बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्याला पवार यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे, त्यामुळे 22 तारखेला गणेश चतुर्थीला PMPMLचा पुन्हा ‘श्री गणेशा’ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.