Pune News: पाच महिन्यांपासून बंद असलेली PMPML आजपासून सुरू

स्वारगेट, पुणे मनपा, शिवाजीनगर, हडपसर, पुणे स्टेशन, हडपसरसारख्या गर्दीच्या मार्गावर सकाळी आणि सायंकाळी शटल सेवा दिली जाणार आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटामुळे मागील 5 महिन्यांपासून बंद असलेली पीएमपीएमएलची सेवा आजपासून सुरू झाली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 190 मार्गांवर आता बस धावणार आहे. तिकीटात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे.

स्वारगेट, पुणे मनपा, शिवाजीनगर, हडपसर, पुणे स्टेशन, हडपसरसारख्या गर्दीच्या मार्गावर सकाळी आणि सायंकाळी शटल सेवा दिली जाणार आहे. त्यासाठी 120 जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी दोनशे बस आधीपासूनच मार्गावर धावत होत्या. उर्वरित दोनशे, अडीचशे बसचा ताफा सेवेसाठी तयार करण्यात आला आहे.

बसमध्ये एकावेळी 17 प्रवाशांना प्रवासाची परवानगी असेल. आठ महिला व नऊ पुरुषांचा समावेश असेल, अशी माहिती pmpml प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. गणेशोत्सवात गर्दी होऊ नये, यासाठी बस सेवा सुरू करण्याचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला होता.

65 वर्षांपुढील ज्येष्ठ आणि 10 वर्षाच्या आतील मुलांना बसमध्ये प्रवेश नाही. मास्क लावूनच बसावे, बसमध्ये कॉइन बॉक्स ठेवण्यात आला आहे. दरम्यान, रोजंदारी सेवकांना आता काम मिळणार आहे. गेल्या 5 महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना काम नव्हते. त्यांना वेतन मिळत नसल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ आली होती.

जवळपास 200 कर्मचाऱ्यांना आता रोजगार मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.