Pune News : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडीसाठी उद्या होणार मतदान

देशमुख-लाड यांच्यातच मुख्य लढत

एमपीसी न्यूज – पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी उद्या (मंगळवार, दि.1 डिसेंबर) मतदान होणार आहे. कोविड 19 च्‍या पार्श्‍वभूमीवर होणारी ही राज्‍यातील पहिलीच निवडणूक असल्‍यामुळे प्रशासनाकडून विशेष काळजी घेत यासाठीचे नियोजन केले आहे.

पुणे पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेच्‍या एका जागेसाठी 62 उमेदवार तर शिक्षक मतदार संघाच्‍या एका जागेसाठी 35 उमेदवार उभे आहेत. पुणे विभागात पदवीधर मतदार संघात एकूण मतदार 4 लक्ष 26 हजार 257 तर शिक्षक मतदार संघात 72 हजार 545 मतदार आहेत.

देशमुख-लाड यांच्यातच मुख्य लढत
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्यातच मुख्य लढत होणार असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. लाड यांनी मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करुन निवडणुक लढवली होती, मात्र यावेळी त्यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिल्याने निवडून येण्याची कसरत त्यांना पार करावी लागणार आहे.

मनसे उमेदवार रुपाली पाटील आणि संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात असून ते कशाप्रकारे लढत देतात हे बाब ही पाहण्यासारखी आहे. शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार प्रा.जयंत आसगांकर आणि भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांच्यातील लढतही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.