Pune News : महाकृषी ऊर्जा अभियानास सकारात्मक प्रतिसाद; राज्यातील 1 लाख 92 हजार शेतकरी थकबाकीमुक्त

एमपीसी न्यूज – कृषी ग्राहकांना विजबिलांतून थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या महाकृषी ऊर्जा अभियानास राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या थकबाकीमुक्ती योजनेत 8 लाख 6 हजार 105 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून गुरुवार (दि.25) पर्यंत त्यातील 1 लाख 92 हजार 529 शेतकऱ्यांनी मूळ थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा भरणा करून 100 टक्के थकबाकीमुक्ती मिळविली आहे.

या थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना वीजबिलांतून तब्बल 255 कोटी 2 लाख रुपयांची सवलत मिळाली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्ती देण्यासाठी एकूण थकबाकीमध्ये तब्बल 66 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. त्याप्रमाणे 44 लाख 44 हजार 165 शेतकऱ्यांकडील एकूण 45 हजार 787 कोटी 19 लाखांच्या एकूण थकबाकीमध्ये 10 हजार 421 कोटी रुपयांची निर्लेखनाद्वारे सूट देण्यात आली आहे तर 4 हजार 672 कोटी 81 लाख रुपयांची व्याज व विलंब आकारामध्ये सूट देण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

या योजनेनुसार कृषी ग्राहकांकडे 30 हजार 693 कोटी 55 लाख रुपयांची सुधारित मूळ थकबाकी आहे. त्यापैकी पहिल्या वर्षात 50 टक्के थकबाकी भरल्यास वीजबिल कोरे करण्याची शेतकऱ्यांना संधी आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या थकीत व चालू वीजबिलांद्वारे भरणा झालेलया रकमेपैकी प्रत्येकी 33 टक्के निधी हा संबंधीत ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रात कृषी वीजयंत्रणेच्या सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी वापरण्याची तरतूद राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या कृषिपंप वीज धोरण- 2020 मध्ये प्रामुख्याने करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत राज्यातील 1 लाख 92 हजार 529 शेतकऱ्यांनी चालू व थकीत वीजबिलांपोटी 330 कोटी 42 लाख रुपयांचा भरणा करून वीजबिलांतून संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळविली आहे. या शेतकऱ्यांनी सुधारित मूळ थकबाकीच्या 50 टक्के रकमेचा एकरकमी म्हणजे 255 कोटी 2 लाख रुपयांसह चालू वीजबिलांच्या 75 कोटी 40 लाख रुपयांचा भरणा केला आहे.

या सर्व शेतकऱ्यांना सुधारित मूळ थकबाकीमध्ये तब्बल 255 कोटी 2 लाख रुपयांची सूट मिळाली आहे. यामध्ये पुणे प्रादेशिक विभाग – 84 हजार 455, कोकण प्रादेशिक विभाग- 68 हजार 67, नागपूर प्रादेशिक विभाग- 30 हजार 219 आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागातील 9 हजार 788 थकबाकीमुक्त शेतकऱ्यांचा समावेश आहे. या सर्व थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना महावितरणकडून थकबाकीमुक्तीचे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.