Pune News : जम्बो हॉस्पिटलमध्ये पोस्ट कोविड ओपीडी

एमपीसी न्यूजशिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारलेल्या अद्ययावत जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांच्या आरोग्य तपासणीची मोफत सुविधा उपलब्ध केली आहे. त्यासाठी स्वतंत्र बाह्य रूग्ण विभाग (पोस्ट कोविड ओपीडी) सज्ज करण्यात आला आहे.

 

कोरोनाबाधीतांना एकाच छताखाली अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज वैद्यकीय सेवा उपलब्ध केली जात आहे. गेल्या 43 दिवसांत 1200 पेक्षा जास्त रूग्णांना उपचारासाठी शिवाजीनगर येथील जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यापैकी 60 टक्क्यांहून अधिक रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अत्यंत वयोवृद्ध, कोरोनाबरोबरच इतर आजार असलेल्या गुंतागुंतीच्या रूग्णांवर या जवळपास दीड महिन्यांमध्ये यशस्वी उपचार करण्यात येथील डॉक्टरांना यश आले आहे. काही रूग्णांनी पंधरा-पंधरा दिवस अतीदक्षता विभागात (आयसीयू) मृत्यूशी अक्षरश: झुंज दिली. मात्र अचूक निदान, योग्य उपचार आणि प्रभावी औषधांचे नियोजन या त्रिसूत्रीमुळे कोरोनामुक्त होऊन जम्बो हॉस्पिटलमधून बाहेर जाणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे, अशी माहिती हॉस्पिटलतर्फे देण्यात आली.

 

 

मात्र, सद्य:स्थितीत कोरोनामुक्त म्हणजे निर्धास्त, असे निश्चित म्हणता येत नाही. विशेषतः मधुमेही, उच्च रक्तदाब, हृदयविकाराच्या रुग्णांना कोरोनामुक्त ‌झाल्यानंतरही धोका कायम असतो. कोरोनामुक्त झाल्यानंतरही सुमारे एक महिनाभर हृदयविकार होण्याचा धोका रहातो. त्यातून हृदयाची क्रिया अचानक बंद पडून रुग्णाचा मृत्यू होण्याची काही अंशी शक्यता असते. तसेच, काही रुग्णांमध्ये अर्धांगवायूचा झटका आल्याचे दिसले आहे. तसेच, खूप दिवस फुफ्फुसांचे आजार सुरू राहिल्यांचेही निदान झाले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रूग्णांची नियमित आरोग्य तपासणी करण्याची मोठी गरज निर्माण झाली. ही गरज ओळखून जम्बो हॉस्पिटलमध्ये पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आली.

 

 

हॉस्पिटलमधून उपचार घेऊन बरे झालेले रूग्ण आणि येथील डॉक्टर यांच्यात विश्वासाचे नाते तयार झाले आहे. त्यामुळे बहुतांश रूग्ण हॉस्पिटलमधून घरी गेल्यानंतर फॉलोअपसाठी पोस्ट कोविड ओपीडीमध्ये येतात, असे निरीक्षण येथील डॉक्टरांनी नोंदविले. रूग्णांची ही आरोग्य तपासणी पूर्णत: मोफत होते. आवश्यकता असेल तर रूग्णांचा एक्स-रे काढला जातो. त्याच वेळी अत्यावश्यक तपासण्यांचा सल्लाही दिला जातो. त्यामुळे जम्बो हॉस्पिटल आणि रूग्ण, त्यांचे नातेवाइक यांच्यात आत्मीयता निर्माण होत असल्याचे दिसते

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.