Pune News : ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या प्रभावातही पुणे व पिंपरी-चिंचवड शहरी भागात वीजपुरवठा सुरळीत; ग्रामीण भागात वीजयंत्रणेला तडाखा

एमपीसी न्यूज : अरबी समुद्रातील ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे शनिवारी (दि. 15) रात्रीपासून पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत असला तरी काही तुरळक प्रकार वगळता सर्व ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात महावितरणला यश मिळाले आहे.

सलग 48 तास महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र सज्ज राहून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची कामगिरी केली. विशेष म्हणजे पुणे परिमंडलातील मोठे व कोविड रुग्णालयांसह ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प व रिफीलिंग उद्योग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्रे, पाणीपुरवठा, मोबाईल टॉवर्स आदींचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात आला.

दरम्यान ग्रामीण भागात लोणावळा, खंडाळा, पानशेत, कामशेत, वेल्हा, मुळशी, जुन्नर आदी भागात वेगवान वादळामुळे वीजयंत्रणेला रविवारी (दि. 16) तडाखा बसल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला. या भागातील सुमारे 1 लाख 36 हजार ग्राहकांपैकी रात्री उशिरापर्यंत 1 लाख 4 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठा युद्धपातळीवर सुरळीत करण्यात येत आहे. मात्र आज (दि. 17) दुपारनंतर अतितीव्र झालेल्या चक्रीवादळामुळे प्रामुख्याने लोणावळा, खंडाळा, कामशेत, वेल्हे, जुन्नर भागात वेगवान वारे वाहत असल्याने तसेच डोंगराळ भागातील निसरडे अरुंद रस्ते व चिखलामुळे दुरुस्ती कामात अडथळे येत होते.

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे पुणे परिमंडलातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. सोबतच युद्धपातळीवर वेगाने पूर्वतयारी सुरु करण्यात आली. विभागस्तरावर स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले. सर्वांच्या रजा रद्द करण्यात आल्या. शनिवारी (दि. 15) रात्रीपासूनच या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवू लागला होता. त्यानंतर रविवारी (दि. 16) दिवसभर पावसाच्या सरींसह जोरदार वारे वाहत होते. यामध्ये पुणे शहरात सुमारे 40 ठिकाणी झाडे व मोठ्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. रात्री उशिरा वेगवान वादळासोबतच पावसाला देखील सुरुवात झाली.

या परिस्थितीमध्ये देखील पुणे शहरातील सर्व वीजपुरवठा सुरळीत होता. तथापि कोंढवा, काकडेवस्ती, टिळेकरनगर, भिलारेवस्ती, गंगा व्हिलेज, उंद्री, पिसोळी, केशवनगर, मुंढवा आदी भागात वीजपुरवठा खंडित झाल्याचे प्रकार घडले. मात्र दीड तासांपर्यंत या सर्व भागातील वीजपुरवठा हा ताबडतोब दुरुस्ती व पर्यायी व्यवस्थेमधून सुरळीत करण्यात आला. काही ठिकाणी रोहित्रे व लघुदाब वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या पडल्याने सोसायटी व वैयक्तिक वीजजोडण्यांची वीज खंडित झाली होती. त्यासाठी तत्काळ दुरुस्ती कामे करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

यासोबतच पिंपरी चिंचवड शहरात देखील काही तुरळक प्रकार वगळता सर्व ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत होता. गेल्या 48 तासांमध्ये केवळ वाकड, हिंजवडी, चऱ्होली, ताथवडे, किवळे या परिसरात वीजवाहिन्यांवर मोठी झाडे तसेच मोठमोठी फ्लेक्स पडल्यामुळे दीड ते दोन तासांसाठी वीजपुरवठा खंडित राहिला. मात्र शहराच्या उर्वरित सर्व भागामध्ये वीजपुरवठा सुरळीत होता. लघुदाब वाहिन्यांवर फांद्या पडल्यामुळे खंडित वीजपुरवठ्याच्या काही वैयक्तिक तक्रारी निवारणाचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.

पुणे परिमंडल अंतर्गत वेल्हे, मुळशी, कामशेत, खानापूर, पानशेत, मावळ, लोणवळा, खंडाळा, कार्ला, जुन्नर आदी ग्रामीण भागांमध्ये ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा वीजयंत्रणेला मोठा तडाखा बसला. वादळी पावसासोबतच वीजवाहिन्यांवर मोठी झाडे व फांद्या कोसळल्याने रविवारी (दि. 16) सुमारे 245 गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता तर त्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणासाठी बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे सुमारे 1 लाख 36 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत 179 गावांमधील 1 लाख 4 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. उर्वरित 66 गावे ही डोंगराळ व अतिदुर्गम असल्याने तेथील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सोमवारी सायंकाळपर्यंत सुरु होते.

त्याआधी दुपारनंतर चक्रीवादळाचे स्वरुप अतीतीव्र झाल्याने वादळाचा वेग पुन्हा वाढला होता. परिणामी लोणावळा, खंडाळा, कार्ला, मुळशी, पानशेत, खानापूर आदी भागात जोरदार वारे वाहत होते. अशा अत्यंत नैसर्गिक प्रतिकूल परिस्थितीत देखील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु होते. काही ठिकाणी पावसामुळे निसरडे रस्ते व चिखल झाल्यामुळे दुरुस्ती कामामध्ये अडथळे येत होते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.