Pune News : 14 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार

एमपीसी न्यूज – पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 1 एप्रिल 2020 पासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्या 14 लाख 29 हजार 811 ग्राहकांचा थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित होणार आहे. पुढील तीन आठवड्यात याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये वीजबिलांच्या थकबाकीसह इतर मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या व्हीडीओ कॉन्फरंन्सिग बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांच्यासह पाचही जिल्ह्यातील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रादेशिक संचालक नाळे म्हणाले की, सद्यस्थितीत पुणे (1032.80 कोटी), सातारा (140.36 कोटी), सोलापूर (259.12 कोटी), सांगली (192.54 कोटी) व कोल्हापूर (337.43 कोटी) जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे एकूण 1962 कोटी 27 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी 1247 कोटी 49 लाख रुपयांची थकबाकी असणाऱ्या 14 लाख 29 हजार 811 वीजग्राहकांनी गेल्या 1 एप्रिल 2020 पासून एकाही महिन्याचे वीजबिल भरलेले नाही. वारंवार प्रत्यक्ष संपर्क साधून देखील ग्राहकांनी थकबाकीचा भरणा केला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव पुढील तीन आठवड्यांत या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल.

_MPC_DIR_MPU_II

पश्चिम महाराष्ट्रात गेल्या 10 महिन्यांमध्ये एकदाही वीजबिल न भरणाऱ्या घरगुती ग्राहकांची संख्या सर्वाधिक 12 लाख 68 हजार 487 असून त्यांच्याकडे 856 कोटी 81 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर 1 लाख 38 हजार 870 वाणिज्यिक ग्राहकांकडे 264 कोटी 32 लाख आणि 22 हजार 454 औद्योगिक ग्राहकांकडे 126 कोटी 35 लाखांची थकबाकी आहे. या कारवाईसाठी पथके तयार करण्याची सूचना त्यांनी केली.

वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा करून सहकार्य करावे. आवश्यकता असल्यास हप्त्यांची देखील सोय केलेली आहे असे आवाहन त्यांनी केले. सोबतच थकबाकीचा भरणा न करणाऱ्या इतर थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा देखील नियमानुसार खंडित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पश्चिम महाराष्ट्रातील वीजबिल भरणा केंद्र सार्वजनिक सुटीच्या दिवशी सुरु
वीजग्राहकांना सार्वजनिक सुटीच्या दिवशी थकबाकी व वीजबिलांचा भरणा करता यावा, यासाठी महावितरणचे पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र फेब्रुवारी महिन्यातील सर्व सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत. या संदर्भात प्रादेशिक कार्यालयातून सर्व कार्यालयांना निर्देश देण्यात आले आहे. याशिवाय घरबसल्या थकबाकी व वीजबिलांचा भरणा करण्यासाठी ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. लघुदाब वीजग्राहकांना ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी http://www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपची सेवा उपलब्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.