Pune News : पुणे, पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागात 36 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

0

एमपीसी न्यूज – महावितरणने वीज बिल थकबाकीदारांना मोठा शॉक दिला आहे. पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे, पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागातील 36 हजार 139 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 89 कोटी 55 लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे.

एक फेब्रुवारीपासून पुणे परिमंडलात थकीत वीजबिलांचा भरणा वाढला असून 1 एप्रिल 2020 पासून एकही वीजबिल न भरलेल्या 97 हजार 413 ग्राहकांनी आतापर्यंत 145 कोटी 75 लाख रुपयांचा भरणा केला आहे. चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शुक्रवार (दि. 19) ते रविवारपर्यंत (दि. 21) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे.

केवळ वीजबिलांच्या वसुलीवर आर्थिक भिस्त असणाऱ्या महावितरणची स्थिती ही वीजखरेदी, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापनांचा खर्च भागविण्याइतपत सध्या राहिलेली नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याचा कटू कारवाई सुरु करण्यात आली आहे. सध्या पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 10 लाख 8 हजार 776 ग्राहकांकडे 819 कोटी 71 लाख रुपयांची थकबाकी आहे. यात घरगुती 8 लाख 49 हजार 990 ग्राहकांकडे 505 कोटी 23 लाख, वाणिज्यिक 1 लाख 38 हजार 648 ग्राहकांकडे 211 कोटी 70 लाख, औद्योगिक 20 हजार 138 ग्राहकांकडे 102 कोटी 77 लाख रुपयांची थकबाकी आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे परिमंडलामध्ये प्रामुख्याने गेल्या 1 एप्रिल 2020 पासून एकही वीजबिल न भरलेल्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांविरुद्ध वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. यात बुधवारपर्यंत (ता. 17) पुणे शहरातील (कंसात थकबाकी) 19388 (42.17 कोटी), पिंपरी व चिंचवड शहर – 9885 (24.90 कोटी) आणि हवेली ग्रामीण, मुळशी, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर, मावळ व खेड तालुक्यातील 6866 (22.48 कोटी) थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये घरगुती- 13650, वाणिज्यिक- 20233 तर औद्योगिक 2256 ग्राहकांचा समावेश आहे. यासोबतच थकीत वीजबिलांचा भरणा करण्यास देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

गेल्या 17 दिवसांमध्ये पुणे परिमंडलातील 97 हजार 413 ग्राहकांनी 145 कोटी 75 लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांचा भरणा केला आहे. यामध्ये घरगुती 66179 ग्राहकांनी 55 कोटी 59 लाख, वाणिज्यिक 28 हजार 5 ग्राहकांनी 63 कोटी 80 लाख आणि औद्योगिक 3229 ग्राहकांनी 26 कोटी 36 लाख रुपयांचा भरणा केला आहे.

ग्राहकांनी थकीत वीजबिलांचा भरणा करून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणने केलं आहे. लघुदाब वीजग्राहकांना घरबसल्या चालू व थकीत वीजबिल ‘ऑनलाईन’ भरण्यासाठी  http://www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून भरणा करता येणार आहे. तसेच, फेब्रुवारी महिन्यातील सर्व सार्वजनिक सुटीच्या दिवशी महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.