Pune News : प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार तरुणाईने पुढे न्यावा : उर्मिला मातोंडकर

एमपीसी न्यूज : प्रबोधन शब्दाचा अर्थ आज दुर्देवाने चुकीच्या अर्थाने वापरला जातो. मानसिक उद्बोधन म्हणजे प्रबोधन. यातून होणारी आचार क्रांती असत्यावर, अन्यायावर घाव घालणारी असते. प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वसा बाळगत तरुणाईने पुरोगामी महाराष्ट्र पुढे न्यावा, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री व शिवसेना पक्षाच्या उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केले.

बालगंधर्व रंगमंदिरात प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांची शताब्दी महोत्सवानिमित्त छायाचित्र, पुस्तकाचे प्रदर्शन, परिसंवाद, चर्चासत्र, व्याख्याने कार्यक्रमाचे उद्घाटन उपसभापती निलम गोऱ्हे, उर्मिला मातोंडकर, समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, प्रबोधनकार ठाकरे यांचे माझे जीवन गाथा हे आत्मचरित्र प्रत्येकाने वाचावे आणि त्याची पारायण झाली पाहिजे. त्यातून समाज निश्चित घडेल आणि यातूनच आपल्याला महाराष्ट्राला पुरोगामी रस्त्यावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी त्याकाळी समजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या विचारांवर आपण पुढे जात आहे. पण आज ही वैचारिक गुलामगिरी पूर्णत: संपलेली नाही.

प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आपल्या समाजासाठी 100 वर्षापुर्वी जेवढे गरजेचे होते. त्याच्याही पेक्षा आजच्या समजाला गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा नेहमी पुरोगामी राज्य असल्याचे म्हटले गेले आहे. त्यामुळे आता प्रत्येकाने त्यांच साहित्य वाचले गेले पाहिजे आणि त्यांचे विचार सर्वापर्यंत पोहोचले पाहिजे, अशी भावना मातोंडकर यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.