Pune News : लेखन कलेसाठी रियाजाची आवश्यकता : दिलीप माजगावकर

एमपीसी न्यूज – लेखन ही गंभीर क्रिया असून लेखना व्यतिरिक्त असलेल्या कलांना जशी रियाजाची आवश्यकता असते तसाच रियाज लेखन कलेसाठी आवश्यक असल्याचे मत राजहंस प्रकाशनाचे प्रमुख दिलीप माजगावकर यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे प्रकाशन विश्वातील प्रदीर्घ वाटचाल आणि राजहंस प्रकाशनाद्वारे साहित्यविश्वात दिलेले योगदान लक्षात घेता राजहंस प्रकाशनाचे प्रमुख दिलीप माजगावकर यांना जीवनगौरव पुरस्काराने तर ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले, यावेळी झालेल्या प्रकट मुलाखतीत माजगावकर बोलत होते.

राजहसं प्रकाशनचे लेखक ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांच्या प्रकट मुलाखतीद्वारे राजहंस प्रकाशन संस्थेचा आणि ओघाने माजगावकर यांचा जीवन प्रवास उलगडला.यावेळी 2019 आणि 2020 या वर्षीच्या उत्कृष्ट ग्रंथ व दिवाळी अंक निर्मिती पुरस्कारांचे देखील वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदचे कार्याध्यक्ष आणि प्रसिद्ध साहित्यीक प्रा.मिलिंद जोशी उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, डायमंड प्रकाशनचे दत्तात्रय पाष्टे उपस्थित होते.

माजगावकर म्हणाले, इंटरनेटच्या लाटेत सुरुवातीला प्रकाशन व्यवसायीक धास्तावले परंतू काळाच्या कसोटीवर जे सकस आणि अस्सल असते तेच टिकते हे अनेक लाटांच्या पार्श्वभुमीवर सिद्ध झाले. तात्कालिक आणि गंभीर लेखन यातील फरक लेखक, प्रकाशक आणि वाचक या त्रयींना लक्षात आल्याने मराठी प्रकाशन व्यवसायावर कितीही संकटे आणि आवाहने आली तरी काळाच्या कसोटीवर प्रकाशन व्यवसाय पाय रोऊन उभा राहील.

प्रकट मुलाखतीत प्रभावळकर यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना मोकळेपणाने उत्तर देतांना माजगावकर म्हणाले, 1960 ते 1980 चा काळ हा सर्वच कलाक्षेत्रांसाठी सुवर्णकाल होता. नाटक, संगीत, साहित्य, मराठी चित्रपट अशा अनेक क्षेत्रात कार्यरत प्रयोगशील व्यक्तिमत्वांचा काहीतरी नवीन देण्याचा झगडा सुरु होता. त्या झगड्यातून उत्तम उत्तम कलाकृती जन्म घेत होत्या. प्रत्येत क्षेत्रातील प्रयोगशीलता रसिकांच्या मनाचा ठाव घेत होती.

ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे म्हणाल्या, आजचा पुरस्कार स्विकारतांना आनंद आणि संकोच अशा मिश्र भावना आहेत. माजगावकरांनी माझ्यातील लेखिका ओळखली आणि माझा सातत्याने पाठपुरावा करीत माझ्याकडून लिहुन घेतले. लिहिताना घ्यावयाची संदर्भ आणि भाषा सर्व पातळीवर माजगावकरांनी मार्गदर्शन केले. प्रकाशकांनी उत्तेजन दिले म्हणुन मी लिहीती झाली.

प्रा, जोशी म्हणाले, माजगावकर हे दूरदृष्टी असणारे प्रकाशक आहेत त्यांनी प्रकाशनाकडे ज्ञान व्यवहार म्हणून पाहिले आणि त्यामुळेच वाचकांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. प्रकाशनाबरोबरच लेखक आणि वाचक यांच्यातला दुवा मजबूत व्हावा म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले. राजहंस ही मराठी साहित्य विश्वातली ठसठशीत नाममुद्रा आहे. प्रतिभा रानडे या इतर मराठी लेखिकांपेक्षा वेगळा संचार, वेगळी वृत्ती आणि वेगळी अभिव्यक्ती असलेल्या अनुभव समृद्ध लेखिका आहेत. परकीय भूमीवरील जीवनाचा वेध घेताना त्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि राजकीय गाभ्यापर्यंत जावून पोचल्या म्हणून त्यांच्या लेखनाला वेगळे परिमाण लाभले. त्यांची पुस्तके म्हणजे भारतीय स्त्री मनाने मुस्लीम स्त्रीयांच्या सामाजिक व धार्मिक प्रश्नांचा मांडलेला वस्तुनिष्ठ आलेख आहे.

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी प्रास्ताविक केले तर डायमंड प्रकाशनचे दत्तात्रय पाष्टे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुकुमार बेरी आणि पराग लोणकर यांनी केल. प्राजक्ता गोगटे यांच्या पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.