Pune News : प्रधानमंत्री आवास योजनेचे चलन लवकरात लवकर घ्यावे : पुणे महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज : महापालिकेकडून प्रधानमंत्री आवास योजनेची 2918 घरांची नुकतीच सोडत पार पडली. या सोडतीमधील लाभार्थ्यांनी चलन घेणे आवश्यक असून अद्याप केवळ 1400 नागरिकांनी चलन घेतलेले नाही. लाभार्थ्यांची दहा टक्के रक्कम भरण्याची मुदत 23 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर चलन घेऊन जावे, असे आवाहन पुणे महापालिका प्रशासनाने केले आहे.

जे लाभार्थी दहा टक्के रक्कम भरतील त्यांना तात्पुरते वाटप पत्र दिले जाणार आहे. लाभार्थ्यांनी 23 तारखेपर्यंत दहा टक्के रक्कम न भरल्यास त्यांचा लाभ रद्द करून प्रतीक्षा यादीतील अर्जदारांना देण्यात येणार आहे. बँक कर्ज तसेच प्रकल्पाच्या माहितीसाठी सावरकर भवन येथे स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे.

महापालिकेने खराडी, हडपसर, वडगाव शेरी येथील पाच प्रकल्पाअंतर्गत घरकुलांचे ऑनलाईन सोडत पद्धतीने वाटप करण्यात आले. सोडतीमध्ये घर मिळालेल्या लाभार्थ्यांनी दहा टक्के रक्कम 30 दिवसात भरणे आवश्यक आहे. यासाठी दहा टक्के रक्कम भरण्यासाठी चलन घेणे आवश्यक आहे.

आतापर्यंत 1500 लाभार्थ्यांनी चलन घेतले आहे. त्यापैकी 240 लाभार्थ्यांनी दहा टक्के रकमेचा भरणा केला आहे. अद्याप 1418 नागरीकांनी हे चलन नेलेले नाही. या नागरिकांच्या सोईसाठी 21 व 22 नोव्हेंबर रोजी सावरकर भवन येथील कक्ष सुरू ठेवण्यात येणार आहे.

ज्यांनी चलन नेले नाहीत अशा नागरिकांनी चलन घेऊन जाऊन 23 नोव्हेंबरपर्यंत दहा टक्के रकमेचा ऑनलाईन भरणा करावा, असे आवाहन महापालिका अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी केले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.