Pune News: जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन व कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रदीप नाईक यांचे उपोषण तूर्त स्थगित

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळातील शिक्षक भरती व आर्थिक बाबींची शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत तातडीने चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्यानंतर तसेच पुणे शहरातील कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन माहिती अधिकारी कार्यकर्ते व महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप नाईक व पीडित अस्मिता सावंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल (गुरुवारी) दिवसभर केलेले उपोषण संध्याकाळी स्थगित केले. 

अस्मिता सावंत यांच्या आई नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या शाळेत सेवेत असताना त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या वारस म्हणून फॅमिली पेन्शनसह कोणतेही लाभ मिळाले नसल्याचा आरोप करीत अस्मिता सावंत व प्रदीप नाईक यांनी संस्थेला निवेदन दिले, मात्र संस्थेने सर्व आरोपांचे खंडन केले होते.

त्यानंतर सावंत आणि नाईक यांनी संस्थेची सखोल चोकशी करण्यात यावी, शिक्षक भरतीची चोकशी करण्यात यावी, शिक्षकांच्या पगारातील फरक का देण्यात येत नाही याची चौकशी करण्यात यावी तसेच पदोन्नती कोणत्या प्रकारे देण्यात येते याची चौकशी करण्यात यावी, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल (गुरुवार) भर पावसात उपोषण केले.

या प्रकरणी शिक्षण उपसंचालकांमार्फत चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन देत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शहरातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती नाईक व सावंत यांना केली. त्यानंतर संध्याकाळी दोघांनी उपोषण मागे घेतले.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या शिक्षक भरती व आर्थिक बाबींचा सखोल चौकशी बाबत केलेली मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संस्थेच्या संबंधित दोषी पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही तात्पुरते उपोषण स्थगिती केले आहे, असे नाईक यांनी सांगितले.

येत्या काही दिवसा आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही 24 ऑक्टोबरला पुन्हा उपोषणास बसणार आहोत. याची नोंद नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाने तसेच प्रशासनाने घ्यावी, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.