Pune News : पुण्यातील कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखा : पक्षनेत्यांची आग्रही मागणी

एमपीसी न्यूज – पुण्यात रोज कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण हे चिंताजनक आहे. ते रोखण्यासाठी प्रयत्न करा, अशी आग्रही मागणी शुक्रवारी महापालिकेतील पक्षनेत्यांनी केली. तर, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सर्व प्रकारच्या बेडसची संख्या वाढविण्याचे आदेश दिले.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे मनपाच्या मुख्य इमारतीमधील स्थायी समिती सभागृह येथे सर्व पक्षनेते यांच्या उपस्थितीत कोविड – 19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली.

या बैठकीसाठी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, काँग्रेस गटनेते आबा बागूल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते वसंत मोरे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, ‘एमआयएम’च्या अश्विनी लांडगे, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शान्तनू गोयल, डॉ. कुणाल खेमनार उपस्थित होते.

कोरोनाची सध्या परिस्थिती तसेच बेड्सची संख्या आणि रुग्णांना आवश्यक ते उपचार देण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजना बाबत यावेळी चर्चा करण्यात आली. पुण्यात पाच हजार नोंदणीकृत डॉक्टर्स आहेत. त्यांची मदत घ्या, शहरातील कोरोना रुग्णांचे मृत्यू रोखा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शहरी गरीब योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. त्याऐवजी नागरिकांचा विमा उतरवा, त्यामुळे गरजू नागरिकांना दोन लाख रुपयांपर्यंतचे विम्याचे संरक्षणही मिळेल, असेही पक्षनेत्यांकडून सांगण्यात आले.

आठशे रुपयांमध्ये दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण असून, त्याचा विचार व्हावा, असे आबा बागूल म्हणाले. तर, कंत्राटी पद्धतीने करोनाबाधितांवर उपचारासांठी भरती केलेल्या डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ यांची बिले अदा केली नसल्याचे विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी सांगितले.

पुणे शहरात वाढत असलेले कोरोना संकट कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि सभागृह नेते धीरज घाटे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.