Pune News: 32 इंच टीव्हीची किंमत बाजारभावापेक्षा 10 ते 12 हजारांनी वाढविली, नगरसेवक महेंद्र पठारे यांचा आरोप

वास्तविकपणे बाजारात व ऑनलाइन सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे हाच टीव्ही 12 ते 16 हजार रुपयामध्ये उपलब्ध आहे.

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाकडून खरेदी केलेल्या 32 इंची टीव्हीची किंमत बाजारभावापेक्षा तब्बल दहा ते बारा हजाराने जास्त दाखवण्यात आली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक महेंद्र पठारे यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही पठारे त्यांनी केली.

कोरोनाच्या काळात महापालिका प्रशासनाने केलेल्या खर्चाचा अहवाल सादर करण्याची मागणी नगरसेवकांकडून सर्वसाधारण सभेत करण्यात आली होती. हा अहवाल मंगळवारी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला. त्यामध्ये महापालिकेच्या सनस स्पोर्ट मैदानाच्या वसतीगृहामध्ये बसवण्यासाठी 32 इंचच्या 30 टीव्ही खरेदी करण्यात आल्या.

यातील एका टीव्हीची किंमत 25 हजार रुपयाला आल्याचे अहवालात नमूद करण्यात आली आहे. वास्तविकपणे बाजारात व ऑनलाइन सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे हाच टीव्ही 12 ते 16 हजार रुपयामध्ये उपलब्ध आहे. प्रति टीव्हीमागे जवळपास 10 हजार रुपये जास्त लावण्यात आले आहेत.

खरेदी केलेल्या टीव्ही संबंधित कंपनीकडून घेतल्या असत्या तर बाजार भावापेक्षा कमी किंमतीत मिळाले असते. पण, विद्युत विभागातील अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांनी संगनमत करून टीव्ही वाढीव किंमतीने खरेदी केल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा खुलासा करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

तर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 5 महिन्यात महापालिका प्रशासनाने वारेमाप खर्च केला आहे. त्यासंबंधीचा खर्चाचा अहवाल तातडीने देण्याची मागणी नगरसेवकांतर्फे करण्यात येत होती. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आवाजही उठविण्यात आला. त्यानंतर महापौरांनी हा अहवाल तातडीने नगरसेवकांना पाठविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने हा अहवाल नगरसेवकांना पाठविला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.