Pune News: पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रस्ताव मुख्य सभेत

Pune News: Proposal to implement 7th pay commission for Pune Municipal Corporation employees in the main meeting पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रस्ताव हा अनेक वर्षांपासून प्रलंबित होता.

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रस्ताव मुख्य सभेत दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली आहे. काँग्रेस – राष्ट्रवादी आणि शिवसेनेतर्फे या प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी केली आहे. हा प्रस्ताव अद्यापही मंजूर झाला नाही. मुख्य सभेच्या प्रस्तावानंतर तो राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या सभेत 13 विषय दाखल करण्यात आले.

पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रस्ताव हा अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. त्यामुळे विरोधी पक्षांनी आता तरी राजकारण करू नये, असे आवाहन सभागृह नेते धीरज घाटे यांनी केले.

त्यावर विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी आक्षेप घेतला. राज्यात तुमचे सरकार असताना तुम्ही काहीही करू शकले नाही. विषय दाखल करायला आमचा विरोध नाही. मात्र, त्यावर चर्चा हवी, त्यासाठी खास सभा घ्या, असे धुमाळ यांनी सांगितले.

तर, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक अजय खेडेकर यांनी हा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची मागणी केली. शासनाच्या ग्रेड पे आणि महापालिकेचा ग्रेड पे यामध्ये अडकलेला सातवा वेतन आयोग अखेर स्थायी समितीने मंजूर केला आहे.

पुणे महापालिकेतील सुमारे 17 हजार अधिकारी – कर्मचारी वर्गाला याचा लाभ होणार आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा निर्णय 20 उपसूचनांसह माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या अध्यक्षतेखालील सर्वपक्षीय समितीने एकमताने घेतला आहे. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केल्यावर वेतनावर महापालिकेला अतिरिक्त 500 कोटी रूपयांचा खर्च येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.