Pune News : ऑनलाइन जीबी विरोधात महापौर दालनात ठिय्या आंदोलन घोषणाबाजी !

एमपीसी न्यूज : राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 8 फेब्रुवारी रोजी मुख्य सर्वसाधारण सभा 200 पटसंख्येच्या नियमावली आणि कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करून घेण्याचे लेखी आदेश दिले होते. तरीही सत्ताधारी भाजपने ऑनलाइन जीबी घेतली. राज्य सरकारच्या आदेशाची पायमल्ली करत लोकशाहीची गळचेपी केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवकांनी महापौर दालनात घोषणाबाजी देत ठिय्या आंदोलन केले.

राज्य सरकारचे ऑफलाइन सभा घेण्याचे आदेश असताना आज (सोमवार दि.8 फेब्रुवारी) ऑनलाइन सभा घेण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय नगरसेवक गैरहजर आहेत.

दरम्यान या सभेच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी ने जोरदार घोषणाबाजी केली. महापौर ज्या ठिकाणी व्हिडीओ काॅन्फरंसिंग करत होते. त्या ठिकाणी दरवाजा उघडण्यासाठी मोठ्या प्रमाणात झटापट झाली.

यावेळी नगरसेवकांनी ‘भाजपचा धिक्कार असो, या चोरांचे करायचे काय, खाली डोके वर पाय, लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या भाजपचा धिक्कार असो’ अशा घोषणांनी महापौर दालन दणाणून सोडले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे म्हणाले, सभागृहात जीबी घ्यायला हवी होती. बेकायदेशीर कामकाज होत आहे. ही लोकशाहीची गळचेपी असून लोकप्रतिनिधींचा चर्चा, मतदान करण्याच्या अधिकारावर गदा आणणारी मनोवृत्ती आहे.

काँग्रेसचे गटनेते आबा बागुल म्हणाले, आजचे कामकाज काळा दिवस आहे. राज्य शासनाकडे तक्रार करू. तर, ऑनलाइन जीबी घेऊन उधळपट्टी होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

या आंदोलनात विरोधी पक्षनेते दीपाली प्रदीप धुमाळ, अश्विनी कदम, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक विशाल तांबे, योगेश ससाणे, भैय्यासाहेब जाधव सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.