Pune news: आळंदी, एकवीरा, जेजुरी देवस्थान परिसरात भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्या – डॉ. नीलम गोऱ्हे

एमपीसी न्यूज – आळंदी, लेण्याद्री, पंढरपूर, एकवीरा आणि जेजुरी यासह राज्यातील देवस्थानात येणाऱ्या भाविकांसाठी पाणी, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याचे नळ, विश्रामगृह, प्रकाश योजना, बैठक व्यवस्था या सोयीसुविधा तातडीने उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

देवस्थान परिसरातील भाविकांसाठीच्या सुविधा, पुरातत्व विभागाकडे असलेले प्रलंबित प्रश्न याबाबत ऑनलाईन आढावा बैठक विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

जुन्नरचे लेण्याद्रीचे तहसिलदार हणमंत कोळेकर, मावळचे तहसिलदार मधुसूदन बर्गे, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने, तेजस्विनी आखळे उपस्थित होते.

मंदिराची पुरातत्व विभागाकडे असलेली प्रलंबित कामे पूर्ण करण्यास वेग द्यावा. या कामासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही देत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, आळंदीसंदर्भात तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या निधीसंदर्भात अहवाल तातडीने सादर करण्यात यावा.

याचबरोबर जेजुरी देवस्थान येथील विकासकामांना देखील गती देण्यात यावी. राज्यातील देवस्थानात भाविकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असून, त्यासाठीच्या कामांना गती द्या. या कामांसाठी सर्वतोपरी सहकार्य देण्यात येणार असल्याचेही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.