Pune News : ‘इएसआयसी’ कोविड रूग्णालयासाठी तातडीने ऑक्सिजन पुरवठा करा : आमदार माधुरी मिसाळ

व्हेंटिलेटर खरेदीसाठी 20 लाखांचा आमदार निधी

एमपीसीन्यूज : बिबवेवाडीतील कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (इएसआयसी) रूग्णालयाचा कोविड रुग्णांवर उपचारांसाठी पूर्ण क्षमतेने उपयोग करता यावा यासाठी या रूग्णालयाला तातडीने ऑक्सिजन पुरवठा करावा, अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी केली आहे.

आमदार मिसाळ म्हणाल्या, ‘कोविडच्या दुसर्‍या लाटेत रूग्णांना सर्व प्रकारचे बेड्‌स मिळताना अडचणी येत आहेत. इएसआयसी रूग्णालयातील बेडची क्षमता 100 इतकी आहे. त्यापैकी 90 बेड्‌सवर ऑक्सिजन आणि 10  बेड्‌सवर व्हेंटिलेटरद्वारे रूग्णांवर उपचार होऊ शकतात.

मात्र, ऑक्सिजनच्या पुरवठ्या अभावी तेथे केवळ 30 रूग्णांवरच उपचार केले जात आहेत. प्रशासनाने तातडीने ऑक्सिजन पुरवठा केल्यास आणखी 70  रूग्णांवर उपचार करता येणे शक्य होणार आहे.’

आमदार मिसाळ म्हणाल्या, ‘पुणे महापालिकेच्या माध्यमातून हे केंद्र चालविण्यात येत आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, नोडल ऑफिसर आणि 20  एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तातडीने ऑक्सिजन पुरवठा झाल्यास रूग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकेल. ’

पुणे शहरात गेल्या आठवडाभरापासून एकही व्हेंटिलेटरयुक्त बेड शिल्लक नसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रूग्णांची मोठी गैरसोय होत आहे. पुणे महानगरपालिकेच्या रूग्णालयांना व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी आमदार विकास निधीतून वीस लाख रूपये उपलब्ध करून दिले असून, प्रशासनाने खरेदीची प्रकिया तातडीने सुरू केली आहे. माधुरी मिसाळ – आमदार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.