Pune News: पालिकेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्या; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज : कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणामुळे मनपा शाळेतील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून दूर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. ऑनलाईन शिक्षण उपयोगी काही सुविधा पालिकेने उपलब्ध केल्यास पालिकेच्या विध्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीचे होईल, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहराचे सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी शिक्षण विभाग प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत आणि उपप्रशासकीय अधिकारी धनंजय परदेशी यांना निवेदन सादर केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेचे सौरभ ससाणे, रवी गाडे, संदेश कोतकर, अमोल गायकवाड उपस्थित होते.

शहरातील जवळपास 50 टक्के गरीब विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत. तसेच मोबाईलला रिचार्ज करण्यासाठी पैशांची चणचण आणि नेटवर्कमध्ये अडथळे अशा कित्येक समस्यांचा सामना करावा लागतो.  वर्षभर कामगार, कष्टकरी वर्गातल्या पालकांच्या मुलांचा शाळेशी संपर्क राहिला नाही, तर त्यांचं शिक्षण थांबेल, अशी भीती आहे.

गरजू विद्यार्थ्यांना काही सुविधा पालिकेने उपलब्ध केल्यास पालिकेच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीचे होईल, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्यासाठी अधिकारी राऊत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.