Pune News : समाविष्ट गावांसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करा ; खा. सुप्रिया सुळे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज : नव्याने महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट केलेल्या 23 गावांचा विकास आराखडा (डेव्हलपमेंट प्लॅन – डीपी) तयार करावा. तसेच रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य आदी पायाभूत सुविधांसाठी 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना केली.

तसेच यापुर्वी समाविष्ट 11 गावांतील शाळा, अंगणवाड्या ज्या पुणे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहेत त्या महापालिका प्रशासनाशी जोडून घ्याव्यात, तसेच वर्ग करून घेतलेल्या ग्रामपंचायत सेवकांचे पगार नियमित करावेत, अशी सुचना देखील त्यांनी केली.

खासदार सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांसह पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे पत्र दिले. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, खडकवासला विधानसभा अध्यक्ष काका चव्हाण, नगरसेवक सचिन दोडके आदी उपस्थित होते.

नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधून ग्रामपंचायत आणि पालिकेकडून गोळा केल्या जाणाऱ्या करामध्ये तफावत आहे. पालिकेची कर आकारणी ग्रामपंचायत कराच्या दीड पटीपेक्षा अधिक नसावी. या गावांमधील निधी अभावी थांबलेली कामे आगामी अंदाजपत्रकात तरतूद करुन कामे पुर्ण करावीत. करारपद्धतीवर काम करणाऱ्या आरोग्य आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना वेतन दिले जात नाही, त्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशा सुचनांचे निवेदन खा.सुळे यांनी आयुक्तांकडे सादर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.